रोहित शर्माबाहेर! पंजाबविरुद्ध ‘हे’ 3 खेळाडू घेऊ शकतात ‘हिटमॅन’ची जागा; कोणाला मिळणार प्लेइंग XI मध्ये संधी?
मुंबई: आयपीएल २०२६ मधील आपल्या पुढील महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्ससमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma Replacement) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातून बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तो फलंदाजी सोडून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. आता रोहितच्या अनुपस्थितीत डावाची सुरुवात कोण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईच्या ताफ्यात असे ३ खेळाडू आहेत जे रोहितची जागा घेऊ शकतात.
१. क्विंटन डी कॉक (अनुभवी पर्याय)
रोहित शर्माचा सर्वात भक्कम आणि अनुभवी पर्याय म्हणून क्विंटन डी कॉक कडे पाहिले जात आहे. आयपीएलमध्ये ३३०० हून अधिक धावा नावावर असलेल्या डी कॉकला सलामीचा मोठा अनुभव आहे. मात्र, त्याला संघात स्थान देण्यासाठी मुंबईला परदेशी खेळाडूंच्या समीकरणात बदल करावा लागेल. डी कॉकला खेळवण्यासाठी ट्रेंट बोल्ट किंवा मिचेल सँटनर यांपैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते.
२. नमन धीर (आक्रमक युवा खेळाडू)
दुसरा पर्याय म्हणजे नमन धीर. नमन आधीच प्लेइंग XI चा भाग आहे, त्यामुळे त्याला संघात बसवणे सोपे होईल. २६ वर्षीय नमनने आतापर्यंत २७ सामन्यांत १७६ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. टॉप ऑर्डरमध्ये तो मुंबईसाठी वेगाने धावा जमवू शकतो आणि पंजाबच्या गोलंदाजांवर दबाव टाकू शकतो.
३. रॉबिन मिंज (नवी संधी)
मुंबई इंडियन्स रोहितच्या जागी युवा रॉबिन मिंजला संधी देऊन सर्वांना धक्का देऊ शकते. मिंजला आयपीएलचा फारसा अनुभव नसला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपली चमक दाखवली आहे. ६५ लाख रुपयांना संघात सामील झालेल्या या खेळाडूसाठी ही स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असू शकते.
