मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, स्मृती इराणींचे राज्यसभेत वक्तव्य

WhatsApp Group

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी देण्याबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, मासिक पाळीच्या रजेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये महिलांसोबत भेदभाव होऊ शकतो. स्मृती इराणी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात या गोष्टी सांगितल्या ज्यात सरकार मासिक रजेसाठी कोणताही कायदा करण्याचा विचार करत आहे का असे विचारण्यात आले होते.

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, “आज महिला अधिकाधिक आर्थिक संधींचा पर्याय निवडत आहेत हे लक्षात घेऊन मी यावर माझे वैयक्तिक मत देईन. मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा एक भाग आहे, हे कोणतंही अपंगत्व नाही. मी स्वतः एक महिला आहे. म्हणूनच मला असे म्हणायचे आहे की मासिक पाळी हा अडथळा नाही. हा स्त्रीच्या जीवन प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे.”

मासिक पाळीपूर्वी शरीर हे सिग्नल्स देऊ लागते, तुमच्यासोबतही असे काही घडते का?

राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांनी एका पुरवणी प्रश्नात विचारले होते की, सरकारने महिला कर्मचाऱ्यांना ठराविक संख्येने सुट्ट्या देण्यासाठी कंपन्यांना बंधनकारक तरतूद करण्यासाठी काही उपाय केले आहेत का? मनोज झा म्हणाले की, माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली बिहार हे पिरियड्ससाठी रजेचे धोरण तयार करणारे पहिले राज्य आहे.

सॅनिटरी नॅपकिन्सबाबतही प्रश्न विचारण्यात आले

सॅनिटरी नॅपकिन्समध्ये घातक रसायनांचा वापर थांबवण्यासाठी सरकार काही पावले उचलण्याचा विचार करत आहे का, असा सवालही मनोज झा यांनी केला. यावर इराणी म्हणाल्या की, हा प्रश्न मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित आहे जो महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या कक्षेत नाही. सरकारने दिलेल्या सॅनिटरी पॅड्सबाबत अशी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.