BBL ठरतंय कोरोनाचा हॉटस्पॉट, दिग्गज अष्टपैलू खेळाडू मॅक्सवेलला कोरोनाची लागण!

WhatsApp Group

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला कोरोनाची लागण झाली आहे. मॅक्सवेल सध्या ऑस्ट्रेलियाची टी-२० लीग स्पर्धा बिग बॅश लीग खेळत आहे. त्यामुळे पूर्ण बिग बॅश लीगवरच कोरोनाचं सावट निर्माण झालं आहे. जगभरासह ऑस्ट्रेलियातही दिवसेंदिवस कोरानाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढतच असल्याने क्रिकेट विश्वाला त्याचा मोठा फटका बसत आहे. सध्या चालू असलेल्या अनेक स्पर्धा या कोरोनाच्या भीतीने प्रेक्षकांशिवाय खेळल्या जात आहेत.

ग्लेन मॅक्सवेल हा बिग बॅश लीगमधील मेलबर्न स्टार्स या संघाचा कर्णधार आहे. मेलबर्न स्टार्सने संघाने आपल्या कर्णधाराला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. मॅक्सवेलला कोरोनाची काही लक्षणे आढळल्याने त्याची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती, ज्यात त्याची चाचणी अहवाल सकारात्मक आला. यानंतर मॅक्सवेलला संघापासून वेगळं करण्यात आलं असून त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

बिग बॅश लीग ठरतंय कोरोनाचा हॉटस्पॉट

यापूर्वी बिग बॅश लीगमध्ये 11 खेळाडूंसह 19 जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. यात सिडनी थंडरच्या 4 तर, मेलबर्न स्टार्सचे 7 खेळाडू आणि आठ सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बिग बॅश लीग स्पर्धा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतंय, हे म्हणणं वावगं ठरणार नाही.


कोरोनामुळे यापूर्वी ब्रिस्बेन हीट आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील सामना कोरोनामुळे खेळला गेला नव्हता. मेलबर्न स्टार्स संघातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याने हा संघ अनेक नव्या खेळाडूंसह खेळत होता. मात्र आता कर्णधारच कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याने संघाची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे.

मागच्या दोन सामन्यात मेलबर्न स्टार्सचे सलग 2 पराभव झाल्यामुळे ते 3 विजयासह बीबीएलच्या गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहेत. कर्णधार असेलेल्या ग्लेन मॅक्सवेललाच कोरोना झाल्याने मेलबर्न स्टार्सचा संघ आणखी अडचणीत आला आहे. तसेच अजून काही खेळाडूंना कोरोनाची लागण होण्याती शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण जगभर वाढताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वींची दिग्गज फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीलाही कोरोनाची लागण झाली होती. तसेच सध्या चालू असलेल्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेतही कोरोनाचा शिरकाव झालेला पाहायला मिळाला होता. अ‍ॅशेसच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला कोव्हिड-19 बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने सामन्याला मुकला होता. तर इंग्लंड संघाच्या ताफ्यातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती.

 

अधिक बातम्या वाचा

मोदींच्या पंजाब दौऱ्यानंतर इंदिरा गांधींच्या ‘त्या’ दौऱ्याची का होतेय चर्चा?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स न्यूझीलंडला धूळ चारत बांगलादेशने मिळवला अविश्वसनिय विजय!