दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांचा होणार सन्मान!

WhatsApp Group

नवी दिल्ली – मेगास्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना उद्या (सोमवारी) 2019 चा 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात येणार आहे. भाजपचे राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांनी या वर्षी एप्रिलमध्ये पहिल्यांदा ही बातमी जाहीर केली होती.

डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल्स, इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सांगण्यात आले आहे की, रजनीकांत यांना 25 ऑक्टोबरला 51 वा दादासाहेब फाळके (dadasaheb phalke award) हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यानंतर रजनीकांत यांनी ट्वीट करत आभारही मानले आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.


2019 साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार गेल्या वर्षी घोषित करायला हवा होता परंतु कोविड -19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आला होता. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार असून हा भारत सरकारकडून दिला जातो.


भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण (Padma Vibhushan) देखील रजनीकांत यांना मिळाला आहे. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी 1975 मध्ये के बालचंदर यांच्या ‘अपूर्व रागांगल’ या चित्रपटातून मधून पदार्पण केले होते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रजनीकांत यांनी तब्बल 45 वर्षांहून अधिक काळ काम केलं आहे.

ए.आर. मुरुगदास यांच्या ‘दरबार’मध्ये अखेरचा दिसलेला ‘कबाली’ अभिनेता रजनीकांत लवकरच त्याच्या बहुप्रतिक्षित ‘अन्नाथे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक शिव यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अन्नाथे’मध्ये नयनतारा, कीर्ती सुरेश, खुशबू आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत.

सुपरस्टार रजनीकांत यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरबार, द रोबोट, त्यागी, चालबाज, अंधा कानून, हम, कबाली, अशा काही हिंदी चिंत्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे.