ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आदिवासी समाजातील क्रांतीकारक तंट्या भिल यांचं उदाहरण दिलं आणि ते आज जिवंत असते तर त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचा खजाना लुटला असता, असं मत व्यक्त केलं. तसेच देशातील जल, जंगल, जमीन, खनिज संपत्ती लुटली जात असल्याचा आरोप केला आहे. त्या पुण्यात जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाच्या (महाराष्ट्र) अधिवेशनात अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या. यावेळी सुनीती. सु. र. यांनी प्रास्ताविक केलं, मानव कांबळे यांनी उद्घाटनाचं भाषण केलं, युवराज गटकळ आणि प्रसाद बागवे यांनी एनएपीएमच्या कामाचा आढावा मांडला.
मेधा पाटकर म्हणाल्या, “आज आपण पाहतो की, बिरसा मुंड्या, तंट्या भिल आणि सरदार पटेल यांचे पुतळे उभारले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात सरदार पटेल यांचा पुतळा उभा करताना ७२ गावे उठवण्यात आली. त्यात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना त्याचा मोबदला देखील देण्यात आला नाही, हे मोदींचं राज्य आहे. तंट्या भिल ब्रिटिशांचा खजाना लुटून गरीबांमध्ये वाटतं होता. आज तंट्या भिल जिवंत असते तर त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचा खजाना लुटला असता आणि गरीबांमध्ये वाटला असता.”
देशातील जल, जंगल, जमीन, खनिज संपत्ती हे सगळे लुटले जात आहे. या लुटीतून हे सर्व उद्ध्वस्त केलं जात आहे. या विनाशात केवळ घरच नाही, तर त्या लोकांचे उपजीविकेचे साधन देखील मूर्खपणे प्रभावित केली जाते. त्यांना काही लाभ देण्याचं आश्वासन दिलं जातं आणि विस्थापित केलं जातं. यावर जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय काम करत आहे,” असं मत मेधा पाटकर यांनी व्यक्त केलं.
नर्मदेसह देशातील प्रत्येक नदी रडत आहे : मेधा पाटकर म्हणाल्या, “आज प्रत्येक ठिकाणी लोक आक्रोषित आहेत. आपल्या हातातील शेती, जंगल, नदी, भुजल वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मात्र, आपण विकासाच्या नावाखाली सब का साथ, सब का विकास म्हणत संसाधनं उपभोगत आहोत आणि त्याचे दुष्परिणामही भोगत आहोत. विस्थापन हा एक परिणाम आहे, तर नर्मदेसह प्रत्येक नदी रडत आहे. पृथ्वी जळते आहे, जंगल संपत चालले आहेत, मग नदी १२ महिने कशी वाहणं शक्य आहे?”
गंगा नदीच्या प्रदुषणाविरोधात पाच साधुसंतांनी जीव गमावला: अविरल और निर्मल बहने दो, असं म्हणत गंगेच्या काठावरील साधुसंतांनी आपले जीव गमावले आहेत. एक नव्हे, तर पाच जणांनी जीव गमावले. आज गंगा नदीच्या शुद्धीकरणाच्या नावे कोट्यावधी रुपयांचा निधी गोळ करणं, तो आंतरराष्ट्रीय पातळीवरून घेणे आणि निधीची विल्हेवाट लावणे, यातून भविष्याचीही विल्हेवाट लावली जात आहे. सर्वाच नद्यांची अशी स्थिती आहे, मात्र, सर्वात दुर्दैवी स्थिती यमुना नदीची आहे. प्रत्येक नदीत वाळू उत्खनन सुरू आहे. नदीत भर घातली जात आहे. यासाठी श्री श्री रवीशंकर यांनाही दंड झाला.
समता – सादगी – स्वावलंबन’ या त्रिसूत्रीवर भर : जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन १५ व १६ एप्रिल २०२३ रोजी हमाल भवन, (मार्केट यार्डजवळ), पुणे येथे झाले. यात ‘समता – सादगी – स्वावलंबन’ या त्रिसूत्रीवर आधारित, पर्यावरण आणि मानवस्नेही पर्यायी विकासनीतीपुढील आव्हाने, त्यांना सामोरे जाण्याचे तात्कालिक व दीर्घकालीन मार्ग शोधण्यावर, त्यासाठीच्या कृतीकार्यक्रमांची आखणी करण्यावर भर देण्यात आला.
देशातील गरीबांची लुटच नाही, तर त्यांना नेस्तनाबूत करून चिरडलं जात : सुनीती सु. र. म्हणाल्या, “एका पातळीवर देशातील गरीबांची केवळ लुटच सुरू नाही, तर त्यांना नेस्तनाबूत करून चिरडलं जात आहे. आधी सरकारवर दोन भांडवलदारांची तळी उचलल्याचा आरोप होत होता. मात्र, आता एकाच भांडवलदाराची तळी उचलून त्याचा गुलाम म्हणून राबणारं हे सरकार आहे. हे सगळेच अनुभवत आहेत.”
करोनात अनेक लहान मुलं, म्हाताऱ्या माणसांचा मृत्यू होऊनही या सरकारला लाज वाटली नाही : याच काळात करोना आला. या संकटाचा सामना करताना या देशातील असंघटीत कष्टकरी देशधडीला लागले. त्यांना अक्षरशः फरफटत नेलं गेलं. त्यांना आपल्या गावाला जाण्यासाठी हजार हजार, दोन दोन हजार किलोमीटर चालावं लागलं. हे करताना अनेक लहान मुलं, म्हातारी माणसंही मृत्यूमुखी पडली. त्याची लाज या सरकारला वाटली नाही. त्याहीवेळी आपलीसारखी जन आंदोलनेच लोकांबरोबर उभी राहिली. हे दुःखाने, पण अभिमानानेच सांगावं लागतं,” असं मत सुनीती सु. र. यांनी व्यक्त केलं.
सीएए-एनआरसी आंदोलन दडपण्यासाठी सरकारला करोना ही संधीच वाटली: त्या पुढे म्हणाल्या, “एका बाजूला देशात महिलांच्या नेतृत्वात सीएए-एनआरसी शाहीन बागसारखी आंदोलनं झाली. देशभरातील महिलांनी आपआपल्या ठिकाणी आंदोलनं केली. हे ऐतिहासिक आंदोलन दडपण्यासाठी सरकारला करोना ही संधीच वाटली. करोना काळात या सरकारने आपली जबाबदारी पार पाडणं सोडाच, पण या देशाची अत्यंत लाजिरवाणी स्थिती केली. गंगेत प्रेतं वाहून गेली आणि जगातच छि-थू झाली.”
शेतकऱ्यांच्या हातातील संसाधनांचं, अधिकारांचं कॉर्पोरेटीकरण: इकतंच नाही, तर त्यानंतर कित्येक वर्षांपासून मागणी असलेल्या हमीभावासारखा कायदा करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हातातील संसाधनांचं, अधिकारांचं कॉर्पोरेटीकरण करणारे कायदे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी दिल्लीच्या सीमांवर आणि देशभरात आपल्या साथींनी लढा दिला आणि या सरकारला झुकावं लागलं आणि शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे लागले”, असंही सुनीती सु. र. यांनी नमूद केलं.
अमित शाह म्हणाले आम्हाला सत्तेत आणलं दर दंगली होणार नाही: स्वागताचं भाषण करताना मानव कांबळे म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं पश्चिम बंगालमध्ये एक भाषण झालं. त्यात ते म्हणाले की, आम्हाला पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आणलं तर राम नवमीच्या उत्सवात होणाऱ्या दंगली होणार नाहीत. ते असं म्हटलेच नाही की, आम्हाला सत्तेवर आणलं तर बेरोजगारी कमी होईल, महागाई कमी होईल, इथल्या महिलांचे अधिकार सुरक्षित राहतील, दलितांना चांगली संधी मिळेल. ते असं काहीच म्हटले नाही, ते म्हणतात आम्हाला सत्तेत आणलं तर श्रीराम नवमीच्या दिवशी होणाऱ्या दंगली होणार नाहीत. त्यांचा हेतू स्पष्ट आहे.”
तर २०२४ नंतर यापेक्षा भयानक अवस्था होऊ शकते : मोदी शाहांनी पुन्हा ही सत्ता कोणत्या मुद्द्यावर मिळवायची आहे हे त्यांना स्पष्ट आहे. त्यांना जात-धर्म, धार्मिक धृवीकरणाच्या मुद्द्यावर सत्ता मिळवायची आहे. त्यांना या आधारावर सत्ता मिळणार असेल, तर यापेक्षा भयानक अवस्था २०२४ नंतर होऊ शकते. जर २०२४ मध्ये मोदी-शाह सत्तेत आले, तर कदाचित लोकांच्या हक्कांवर लढणाऱ्या सामाजिक संघटनांची अशी अधिवेशनं पुन्हा घेण्याची संधी मिळेल की नाही याबद्दल माझ्या मनात भीती आहे,” असंही मानव कांबळे यांनी नमूद केलं.