शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे पणन संचालकांचे आवाहन

WhatsApp Group

मुंबई, दि. 29 : सन २०२२-२०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी  दि. ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल२०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पणन संचालक  यांनी केले आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार मध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये व  जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

तरी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा अनुदान योजना सन २०२२ -२०२३ चा लाभ घेण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक, तालुका उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.

अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे

विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा, बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत, ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबियांच्या नावे आहे अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र. आवश्यक आहे.

सदर अर्ज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्या कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक, नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांचेकडे विहित वेळेत सादर करावेत, असे पणन संचालक यांनी कळविले आहे.