Nobel Peace Prize शांततेचा नोबेल मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर

WhatsApp Group

व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी पक्षनेते मारिया कोरिना मचाडो (Maria Corina Machado) यांना २०२५ चा नोबेल शांततेचा पुरस्कार जाहीर केला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अनेकदा असा दावा केला होता की, त्यांनी जगातील अनेक युद्धे शांततेच्या मार्गाने थांबवली आहेत, त्यामुळे यंदा त्यांना नोबेल शांततेचा पुरस्कार (Nobel Peace Prize) मिळावा.

मात्र, नॉर्वेजियन नोबेल समितीने (Norwegian Nobel Committee) हा दावा नाकारत पुरस्कार मारिया कोरिना मचाडो यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे ट्रम्प यांचे नोबेल शांततेचे स्वप्न भंगले आहे.

व्हेनेझुएलामध्ये मारिया कोरिना मचाडो यांना लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या कामगिरीमुळे व्हेनेझुएलाची आयर्न लेडी म्हणूनही ओळखले जाते. यापूर्वी त्यांचे नाव टाइम मासिकाच्या २०२५ च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्ती यादीतही समाविष्ट झाले होते.

ओस्लो येथे आज विजेत्याची घोषणा करण्यात आली. नॉर्वेजियन नोबेल समितीच्या मते, २०२५ च्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी यावर्षी ३३८ नामांकने प्राप्त झाली होती, त्यामध्ये २४४ व्यक्ती आणि ९४ संस्था होत्या. समितीने म्हटले की, व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य व शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी मारिया कोरिना मचाडो यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.