
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदर पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत आहे. आता तिचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलीस तयारीत असून तिला आता पुन्हा पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी हे मात्र ठाणे न्यायालयात ठरणार आहे. काल तिची ठाणे पोलिसांनी आठ तास चौकशी केली.
ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यामध्ये केतकीविरुद्ध कलम ५००, ५०१ आणि १५३ अन्वये (बदनामी करणे, तेढ निर्माण करणे) या कलमांखाली गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणामध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने तिला १४ मे रोजी अटक केली होती. तिची अजूनही चौकशी सुरु आहे.
हीच चौकशी पूर्ण न झाल्यामुळे ठाणे पोलीस आज पुन्हा तिला वाढीव पोलीस कोठडी देण्याची मागणी ठाणे न्यायालयाला करण्याची शक्यता आहे. तिच्याकडून हस्तगत करण्यासारखे काहीच नसल्यामुळे आता पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याची शक्यताही जवळपास कमी आहे. ठाणे पोलिसांनी तिला अटक केली, त्याचवेळी गोरेगाव पोलीसही तिचा ताबा घेण्यासाठी ठाणे न्यायालयामद्धे दाखल झाले होते. त्यामुळे तिला ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रीया पूर्ण केल्यास न्यायालयातून गोरेगाव पोलिसांना केतकीचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.