मनोहर जोशी यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात दाखल

0
WhatsApp Group

मुंबई लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मुंबईतील पीजी हिंदुजा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या आरोग्य बुलेटिननुसार मनोहर जोशी सेमी कोमात असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले नाही. त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

रुग्णालयाच्या आरोग्य बुलेटिननुसार मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजमुळे हिंदुजा रुग्णालयात आणण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर डॉ.चारुलता साखला यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मनोहर जोशी यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

मनोहर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत, हे विशेष. त्यांना जोशी सर म्हणूनही ओळखले जाते. मनोहर जोशी 86 वर्षांचे आहेत. शिवसेनेतून विधानपरिषदेवर निवडून येऊन त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1976 ते 1977 या काळात ते मुंबईचे महापौरही होते. शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर 1995 मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. यानंतर मनोहर जोशी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.