मनिका बत्रानं रचला इतिहास, आशियाई टेबल टेनिसच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी ठरली पहिली भारतीय

WhatsApp Group

Asian Cup Table Tennis: भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा शुक्रवारी बँकॉक येथे खेळल्या जाणाऱ्या आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चेन सू यूचा 4-3 असा पराभव करून ही कामगिरी केली.

जागतिक क्रमवारीत 44व्या स्थानावर असलेल्या मनिकाने जागतिक क्रमवारीत 23व्या क्रमांकाच्या चेनचा 6-11, 11-6, 11-5, 11-7, 8-11, 9-11, 11-9 असा संघर्षपूर्ण महिला एकेरीच्या लढतीत पराभव केला. मोनिकाची उपांत्य फेरीत कोरियाची जिओन जिहे आणि जपानची मीमा इटो यांच्यातील विजेत्याशी लढत होईल.

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये, मनिका बत्रा ऑलिम्पिकमधील 32 च्या एकेरी फेरीत स्थान मिळवणारी भारतातील पहिली महिला टेबल टेनिस खेळाडू ठरली होती. कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक विजेती, 2 वेळा ऑलिम्पियन आणि इतर अनेक कामगिरी, मनिका ही भारतीय टेबल टेनिसमधील सर्वोत्तम स्टार खेळाडूंपैकी एक आहे.

या वर्षी बर्मिंगहॅम येथे झालेल्या 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मनिका बत्रा सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. तिने चार स्पर्धांमध्ये भाग घेतला होता, मात्र तिला एकही पदक जिंकता आले नाही. या पराभवानंतर ती खूप भावूक झाली होती.