Pune: “दोन दिवस ऊसाच्या शेतात लपला, तहान लागली म्हणून बाहेर आला”, स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील नराधमाला अखेर अटक

पुणे: स्वारगेट बस स्थानक परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरोपीच्या शोधात असलेल्या पोलिसांनी गुणाट गावातून त्याला ताब्यात घेतले. या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली होती, आणि पोलिसांवर आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचा मोठा दबाव होता.
या प्रकरणानंतर स्वारगेट पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. दोन दिवस ऊसाच्या शेतात लपून बसलेल्या आरोपीला जेवण मिळत नव्हते. त्यामुळे तो रात्रीच्या वेळी आपल्या नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी जात होता. पोलिसांनी याच माहितीच्या आधारे त्याचा मागोवा घेतला. अखेर, रात्री एक वाजता तो कॅनॉलजवळ झोपलेला असताना शोधमोहीम राबवणाऱ्या पोलिसांना दिसला. त्यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेऊन पुण्याला रवाना करण्यात आले आहे. स्वारगेट पोलिसांनी गुणाट गावात सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले.
स्वारगेट बस स्थानक हे पुण्यातील एक महत्त्वाचे आणि वर्दळीचे ठिकाण आहे. या ठिकाणी देशभरातून प्रवासी ये-जा करतात. दोन दिवसांपूर्वी येथे एका महिलेवर बलात्काराची घटना घडली होती, ज्यामुळे संपूर्ण पुणे हादरले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीच्या मागावर राहण्याचा निर्णय घेतला होता.
स्वारगेट बस स्थानक परिसरात घडलेल्या या गुन्ह्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी जलद तपास करून आरोपीला अटक केल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आता या प्रकरणात न्याय मिळेल याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.