ममता दीदींनी घेतली पवारांची भेट, म्हणाल्या आम्ही एकत्र आल्यास भाजपचा सहज पराभव करू!

WhatsApp Group

मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सिल्व्हर ओकवर झालेल्या या भेटीत सुमारे तासभर दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे जुने नाते आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली आणि आज त्या राजकीय चर्चेसाठी आल्या आहेत, असे पवार म्हणाले. बंगालमधील विजयाबाबत त्यांनी आपला अनुभव आम्हाला सांगितला. जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत ते आमच्यासोबत उभे राहून भाजपशी लढू शकतात असंही पवार म्हणाले.


यावेळी, ममता बॅनर्जी म्हणाल्या रूग्णालयात दाखल असलेले उद्धव ठाकरे लवकरत तंदुरुस्त व्हावेत अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक मजबूत पर्यायी शक्ती उभी करणार आहोत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याशी राजकीय चर्चा करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. नरेंद्र मोदींच्या विरोधात आम्ही सक्षम विरोधक तयार करत आहोत.

त्याआधी, ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथील वायबी चव्हाण हॉलमध्ये लोकांची भेट घेतली. तेथे त्या म्हणाल्या सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाचा सहज पराभव होऊ शकतो. यावेळी त्यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला त्या म्हणाल्या ‘ जर कोणी काहीच करत नसेल, विदेशात राहत असेल तर कसं होईल.

केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षाचा चेहरा बनणार का, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या मी एक छोटी कार्यकर्ता आहे आणि मला कार्यकर्ताचं राहायचं आहे. मात्र स्वत:वर विश्वास ठेवणारेच सर्व काही करू शकतात असंही त्या म्हणाल्या.

ममता बॅनर्जी मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात भेटणार होत्या. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्धव ठाकरे यांची भेट घेता येणार नसल्याचे शिवसेनेने निवेदनात म्हटले आहे.

टीएमसीमध्ये इतर पक्षांतून लोक येण्याची प्रक्रिया सुरूच आहे. याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला आहे. आसाम आणि मेघालयमध्ये अनेक काँग्रेस नेते टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. ममता दिल्लीत येण्याआधी काही काळ सोनिया गांधी यांच्या भेटीची अटकळ बांधली जात होती, मात्र ही भेट झाली नाही. तेव्हापासून या दोघांमधील अंतराबाबत राजकीय वर्तुळात विविध गोष्टी समोर आल्या आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही या दोघांमधील वाढते अंतर स्पष्टपणे दिसून येते.