11 लाख महिना अन् 10 एकर जमीन! ‘तिसरी पत्नी’ होण्यासाठी अभिनेत्रीला मिळाली कोट्यवधींची ऑफर

WhatsApp Group

मलेशियाई अभिनेत्री एमी नूर टिनी हिने नुकत्याच दिलेल्या एका खळबळजनक मुलाखतीमुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. एका अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित (VVIP) व्यक्तीने तिला आपली ‘तिसरी पत्नी’ होण्यासाठी दिलेल्या कोट्यवधींच्या ऑफरचा खुलासा तिने केला आहे. मात्र, पैशांपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व देत एमीने ही ऑफर नाकारून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

दरमहा ११ लाखांचा भत्ता आणि लक्झरी लाइफस्टाइल

२५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर सफवान नजरी याच्या पॉडकास्टमध्ये एमीने हा खुलासा केला. तिने सांगितले की, जेव्हा ती २३ वर्षांची होती आणि ब्यूटी पेजेंट्समध्ये सक्रिय होती, तेव्हा एका ‘दात्तुक’ (मलेशियातील प्रतिष्ठित पदवी) व्यक्तीने तिला लग्नासाठी विचारले होते. तिसरी पत्नी होण्याच्या बदल्यात तिला एक आलिशान बंगला, एक महागडी कार आणि १० एकर जमीन देण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय, खर्चासाठी दरमहा ५०,००० रिंगित (सुमारे ११ लाख भारतीय रुपये) देण्याचीही ऑफर होती.

‘माझी आई मला विकणार नाही’; एमीचे सडेतोड उत्तर

एमीच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा निर्णय होता, परंतु तिची आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. या ऑफरबद्दल एमी म्हणाली, “माझ्या आईने अतिशय कडक शब्दांत त्या व्यक्तीला नकार दिला. ती मला कोणाकडे विकणार नव्हती.” एमीने पुढे स्पष्ट केले की, केवळ श्रीमंती तिला आकर्षित करू शकत नाही. “श्रीमंत जोडीदार असणे हा एक बोनस असू शकतो, पण ती माझी प्राथमिकता नाही. मला माझ्या हक्काच्या कमाईने आई-वडिलांची सेवा करायची आहे आणि योग्य मार्गाने पैसे कमवायचे आहेत,” असे तिने अभिमानाने सांगितले.

सौंदर्याबद्दलही व्यक्त केले मिश्किल मत

या गंभीर विषयावर बोलताना एमीने थोडा विनोदी सूरही लावला. तिने सांगितले की, जोडीदाराची निवड करताना शारीरिक आकर्षणही महत्त्वाचे असते. हसत हसत ती म्हणाली, “जर तो माणूस ‘आयरन मॅन’ सारखा दिसत असता, तर मी कदाचित विचार केला असता. पण जर तो आजोबांसारखा दिसत असेल, तर नक्कीच नाही.” सध्या २९ वर्षांची असलेली एमी एक यशस्वी अभिनेत्री, टीव्ही होस्ट आणि उद्योजिका आहे. ती सध्या कोणाच्याही प्रेमात नसून आपले करिअर आणि बिझनेसवर लक्ष केंद्रित करत आहे.