उल्हासनगर – थेरगाव क्वीन प्रकरण ताजे असतानाच आता उल्हासनगरात इन्स्टाग्रामवर दादागिरीचे व्हिडीओ बनवून टाकणे काही तरुणांना महागात पडले आहे. कारण हे व्हिडीओ टाकून समाजामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना थेट जेलची हवा खावी लागली आहे.
उल्हासनगरमधून इन्स्टाग्रामवर काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. यात काही तरुण दादागिरीची भाषा करत वापरत शिवीगाळ करत होते. विशेष म्हणजे काही व्हिडिओमध्ये तरुणांच्या हातामध्ये बंदुकासुद्धा दिसत होत्या. यामध्ये 307, 302 असेही शब्दप्रयोग वापरण्यात आले होते. हे कलम हत्येचा प्रयत्न आणि हत्या यांचे असल्याने संबंधित तरुण समाजामध्ये दहशत माजवून दादागिरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
कृष्णा कुंभार, विशाल कुंभार, अभय गायकवाड, रोशन मलिक आणि एक अल्पवयीन मुलगा अशा एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी चौघांची न्यायालयीन कोठडीत, तर एकाची बालसुधारगृहामध्ये रवानगी करण्यात आल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे.