शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांचे नुकसान टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

WhatsApp Group

पुणे – डाळिंब फळावरील खोड भुंगेरा नियंत्रणासाठी कृषि विभागाने विशेष प्रयत्न करावे. यामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासोबत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे याकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

विधान भवन येथे आयोजित पुणे विभागीय खरीप हंगाम-2022 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, कृषी आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. या कार्यक्रमाला गती देण्यासाठी सहकार विभागानेही पुढाकार घ्यावा. ‘विकेल ते पिकेल’ योजनेअंतर्गत मागणी असलेल्या पिकांना प्रोत्साहन द्यावे. बीडच्या धर्तीवर पीक विमा योजना राबविण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात आली आहे. पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना फायद्याचा निर्णय घेण्यात येईल, यासाठी याच आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येईल.

केंद्र सरकारच्या फलोत्पादन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा पूर्ण उपयोग करावा. शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे खते, बियाणे मिळतील, याची दक्षता घ्यावी, यासाठी गुणनियंत्रण पथकाने दक्ष राहावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.