मोठा दहशतवादी हल्ला; 70 जणांचा मृत्यू, 115 जखमी

WhatsApp Group

Moscow Terrorist Attack: रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. येथे क्रॉक्स सिटी हॉलमध्ये पाच सशस्त्र लोकांनी जमावावर गोळीबार केला. या हल्ल्यात 70 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 115 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती देताना रशियन आरोग्य मंत्रालयाचे प्रमुख मुराश्को यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल असलेल्या 115 लोकांपैकी 60 जणांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये हा हल्ला झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रॉईक्स सिटी हॉलमध्ये एक कॉन्सर्ट सुरू असताना काही अज्ञात लोक जबरदस्तीने घुसले आणि त्यांनी जमावावर गोळीबार सुरू केला. हॉलमध्ये गोळीबार करण्यासोबतच दहशतवाद्यांनी ग्रेनेडनेही हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रशियन नॅशनल गार्ड्स घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. नॅशनल गार्ड्सने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली आहे. यासोबतच 50 हून अधिक रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या कठीण परिस्थितीत आम्ही रशियन सरकारसोबत आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. “आम्ही मॉस्कोमधील या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या दुःखद प्रसंगी भारत सरकार रशियन फेडरेशनच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहे,” असे मोदी म्हणाले.

शा हल्ल्याने रशिया हादरण्याची ही पहिलीच वेळ नाही. रशियाच्या मॉस्कोने गेल्या 25 वर्षांत अशा अनेक हल्ल्यांचा सामना केला आहे. ज्यात शेकडो निरपराधांना आपला जीव गमवावा लागला आहे. मॉस्कोमध्ये गेल्या 25 वर्षांतील काही सर्वात वाईट हल्ल्यांवर एक नजर टाकू.

1999 मध्ये हल्ला
13 जानेवारी 1999 च्या पहाटे आग्नेय मॉस्कोमधील आठ मजली अपार्टमेंट इमारतीत बॉम्बस्फोट झाला. ज्यामध्ये 118 जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला अपार्टमेंट इमारतींवर झालेल्या पाच हल्ल्यांपैकी एक होता ज्यात मॉस्को आणि दक्षिण रशियामध्ये दोन आठवड्यांत एकूण 293 लोक मारले गेले. मॉस्कोने मुख्यतः मुस्लिम बहुल उत्तर काकेशस प्रजासत्ताक चेचन्यामधील फुटीरतावादी “दहशतवाद्यांवर” हल्ल्यांना जबाबदार धरले. अध्यक्ष व्लादिमीर पुतिन चेचन्यातील फुटीरतावादी बंड चिरडून टाकण्यासाठी काउंटर ऑपरेशन सुरू करणे योग्य मानतात आणि त्यासाठी त्यांनी अनेक हल्लेही केले आहेत.

2002 मध्ये हल्ला 
23 ऑक्टोबर 2002 रोजी, 21 पुरुष आणि 19 महिला चेचन बंडखोरांच्या गटाने मॉस्कोच्या दुब्रोव्का थिएटरमध्ये एका मैफिलीदरम्यान हल्ला केला. थिएटरमध्ये 800 हून अधिक लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. दोन दिवस आणि तीन रात्री सुरक्षा दलांसोबत त्यांचा संघर्ष सुरू होता. हल्लेखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा दलांनी थिएटरमध्ये गॅस गोळीबार सुरू केल्यावर तो संपला. एकूण 130 ओलिस मारले गेले. यातील बहुतेकांचा गॅसमुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रॉक कॉन्सर्ट हल्ला 2003
5 जुलै 2003 रोजी मॉस्कोजवळील तुशिनो एअरफील्डवर एका रॉक कॉन्सर्टदरम्यान दोन महिला आत्मघाती हल्लेखोरांनी स्वत:ला उडवले. ज्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. या महिलांना रशियाने चेचन फुटीरतावादी म्हणून ओळखले होते. या कॉन्सर्टमध्ये रशियातील काही टॉप बॅण्ड्स ऐकण्यासाठी सुमारे 20,000 लोक आले होते.

मेट्रो बॉम्बस्फोट 2004 आणि 2010
6 फेब्रुवारी 2004 रोजी, चेचन गटाने पहाटे खचाखच भरलेल्या मॉस्को मेट्रोमध्ये बॉम्बस्फोट केला, ज्यात 41 लोक ठार झाले. 29 मार्च 2010 रोजी मॉस्को मेट्रोमध्ये आणखी दोन महिला आत्मघाती हल्लेखोरांनी स्वत:ला उडवले. या हल्ल्यात चाळीस लोक मारले गेले. हल्लेखोरांनी एफएसबी गुप्तचर सेवांच्या मुख्यालयाशेजारी असलेल्या लुब्यांका स्टेशनला लक्ष्य केले. दोन्ही हल्लेखोर दागेस्तानच्या अस्थिर उत्तर काकेशस भागातील होते.

विमानतळावर हल्ला 2011
24 जानेवारी 2011 रोजी, मॉस्को डोमोडेडोवो आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आगमन हॉलवर आत्मघातकी बॉम्बरने हल्ला केला, ज्यात 37 लोक ठार झाले. काकेशस एमिरेट ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.