महाराष्ट्रातील सर्वात वृद्ध वाघ ‘वाघडोह’ याचा वृद्धापकाळाने मृत्यू

WhatsApp Group

महाराष्ट्रातील सर्वात वयोवृद्ध म्हणून ओळखला जाणाऱ्या वाघाचा मृत्यू झाला आहे. हा वाघ (Tiger) वन्यप्रेमींमध्ये ‘वाघडोह’ (Waghdoh) नावाने ओळखला जात असे. तो 17 वर्षांचा होता. चंद्रपूर (Chandrapur) येथील सिनाळा ((Sinala Forest) जंगलामध्ये या वाघाचा निवास होता. नैसर्गिक अधिवासात नैसर्गिक रित्याच या वाघाचा मृत्यू झाला. राज्यातील सर्वात वयोवृद्ध वाघ म्हणून तो गणला जात असे. पाहताक्षणी नजरेत भरेल असे धिप्पाड शरीर लाभलेला हा वाघ प्रदीर्घ काळ व्याघ्र प्रकल्पात तळ ठोकून होता. वयपरत्वे मर्यादा आल्यानंतर जंगलातील तरण्याबांड नव्या वाघांनी त्याला बाहेर हुसकून लावले.

जंगलातील तरण्या वाघांनी हुसकाऊन लावल्यावर या वाघावर नरमाइने जगण्याची वेळ आली होती. शेवटी ताडोबानजिक असलेल्या बफर जंगलपरिसरामध्ये तो भटकत असे. वाढत्या वयासोबत शिकार करण्यावर मर्यादा आल्या होत्याच. या मर्यादांसह तो सहज मिळेल ती शिकार करुन आपली गुजराण करत होता. पुढे त्यावरही मर्यादा आल्या.

दरम्यान, सिनाला येथे काही दिवसांपूर्वीच एका गुराख्याचा मृत्यू झाला होता. या वाघानेच चाल केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांसह वनाधिकाऱ्यांनाही संशय होता. पुढे अल्पावधीतच जर्जर झालेल्या या वागाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. तेव्हाच तो आता काही दिवसांचाच सोबती राहिला असल्याचे मत वन्यप्रेमिंचे झाले होते. अखेर आज सिनाळा जंगलामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. वाघाचे सर्व अवयव सुस्थितीत होते. प्रदीर्घ काळ जगलेला हा वाघ अखेर सोडून गेल्याने वन्यप्रेमी व्यतिथ झाले आहेत.