महाराष्ट्र सरकारने रतन टाटा यांना पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषदेत महाराष्ट्रातील उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांबाबत चर्चा करताना या पुरस्काराबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, उद्योगपतींनी समाजासाठी केलेल्या अनुकरणीय सेवेचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारने ‘उद्योगरत्न’ पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुरस्कार ‘महाराष्ट्र उद्योग रत्न’ म्हणून ओळखला जाणार असून टाटा समूहाचे रतन टाटा यांना पहिल्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर हा पुरस्कार अपेक्षित आहे. या योजनेत होतकरू महिला आणि तरुण उद्योजकांसाठीही पुरस्कार असतील, असेही सामंत म्हणाले.