मुंबई : “महाराष्ट्राच्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्र आपलेसे केले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी छाप पाडली, तर आता खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने तिसऱ्यांदा विजेतेपदाची कामगिरी केली. या कामगिरीने महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्रातील एक पाऊल पुढे पडले आहे. भविष्यातही महाराष्ट्राचे खेळाडू असेच चमकदार कामगिरी करतील आणि ऑलिम्पिक स्पर्धेतील आपला टक्का वाढवतील यात शंका नाही. याची ही चाहूल आहे. महाराष्ट्र सरकार खेळाडूंच्या सतत पाठिशी उभे राहिल. खेळाच्या विकासासाठी आणि खेळाडूला काही कमी पडणार नाही. सगळ्या सुविधा महाराष्ट्रात कशा उपलब्ध होतील, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. खेळाडूंनी कामगिरीत असेच सातत्य राखावे, सरकार त्यांच्या पाठिशी नाही, तर बरोबरीने उभे राहिल असा मी विश्वास देतो,” अशा शब्दात राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले.
महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात १६१(५६, ५५, ५०) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. यापूर्वी २०१९ पुणे आणि २०२० आसाम येथेही महाराष्ट्र विजेते ठरले होते. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी तीन सुवर्ण आणि प्रत्येकी एका रौप्य, तसेच ब्रॉंझपदकाची कमाई केली. कुस्तीत नरसिंग पाटील ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला.
🏆 CHAMPIONS! Congratulations to Maharashtra on winning the Khelo India Youth Games title for the third time.
🙌 Kudos to every athlete on participating & winning medals!
📷 Khelo India • #KIYG2022 #KheloIndiainMP #TeamIndia #BharatArmy pic.twitter.com/HdRtloHZqL
— The Bharat Army (@thebharatarmy) February 12, 2023
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी अपेक्षाने ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत ३३.९२ सेकंदात जिंकली. मुलांच्या ५० मीटर फ्री-स्टाईल शर्यतीत जयवीर मोटवानीने २४.३२ सेकंद वेळ देत सोनेरी कामगिरी केली. याच स्पर्धा प्रकारात अर्जुनवीर गुप्ता रौप्यपदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राला आजचे आणि स्पर्धेतील अखेरचे सुवर्णपदक ४ बाय १०० मीटर फ्री-स्टाईल रिले शर्यतीत मुलांनी मिळवून दिले. या संघात ऋषभ दास, अर्जुनवीर गुप्ता, शुभंकर पत्की, वेदांत माधवन यांचा समावेश होता. त्यांनी ३ मिनिट ३७.६५ सेकंद अशी वेळ दिली. मुलींच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात धृती अग्रवाल तिसरी आली. तिने २ मिनिटे २८.६७ सेकंद अशी वेळ दिली.
कुस्तीत नरसिंग पाटील ला ब्रॉंझ
महाराष्ट्राला खेलो इंडिया स्पर्धेतील कुस्तीमध्ये शेवटच्या दिवशी एका ब्रॉंझपदकाची कमाई झाली. कोल्हापूरच्या नरसिंग पाटील याने फ्री स्टाईल विभागातील ५५ किलो गटात हे यश संपादन केले. त्याने राजस्थानच्या अनुज कुमार याच्यावर शानदार विजय मिळविला. उपांत्य फेरीत त्याला राजस्थानच्या ललित कुमार याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. नरसिंग हा बेळगाव येथील आर्मी बॉईज इन्स्टिट्यूटमध्ये सराव करीत आहे.
महाराष्ट्राला कुस्तीमध्ये यंदा येथे दोन सुवर्ण, तीन रौप्य व तीन कांस्यपदकांची कमाई झाली. स्पर्धेत महाराष्ट्राला योगासन, तलवारबाजी या क्रीडाप्रकारात घवघवीत यश मिळाले. मल्लखांबमध्येही महाराष्ट्राचे खेळाडू चमकले. जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने आपली छाप पाडली. सायकलिंगमध्ये पूजा दानोळेने आपला ठसा उमटविला. टेबल टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, कुस्ती, नेमबाजी या प्रकारातही यश मिळविले.
वीस क्रीडा प्रकारात पदक
महाराष्ट्राने स्पर्धेत २२ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. यापैकी वीस क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने किमान एक तरी पदक कमावले. केवळ कलरीपटायु आणि गतका या दोन खेळात महाराष्ट्र पदक मिळवू शकला नाही.
अतिशय भूषणावह कामगिरी, महाराष्ट्राची शान उंचावली- देओल
महाराष्ट्राने खेलो इंडिया स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकून अतिशय भूषणावह कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे महाराष्ट्राची शान उंचावली आहे आणि महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंच्या पुढे त्यांची ही कामगिरी आदर्श ठरली आहे असे राज्याच्या क्रीडा व युवक खात्याचे सचिव श्री रणजीत सिंह देओल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,”महाराष्ट्र संघाच्या या विजयामध्ये संघातील सर्व खेळाडू त्यांचे प्रशिक्षक सर्व जिल्हा व राज्य संघटक खेळाडूंचे सर्व पालक यांचा मोठा वाटा आहे. ”
नेत्रदीपक कामगिरीने भारावून गेलो- डॉ. दिवसे
“आमच्या खेळाडूंनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावीत महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला आहे. खेळाडूंच्या या कामगिरीने मी अतिशय भारावून गेलो आहे. हरियाणाच्या तुलनेत आमच्या पथकात कमी खेळाडू होते तरीही आमच्या खेळाडूंनी क्षमतेच्या 100% कामगिरी करीत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळवून दिले. महाराष्ट्राचे हे यशस्वी खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमक दाखवतील आणि ऑलिंपिक सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतही महाराष्ट्राची पताका उंचावतील,” अशा शब्दात महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंचा गौरव केला.