हिवाळी अधिवेशनात रंगला कलगीतुरा, विरोधकांचा सभात्याग
काँग्रेसच्या नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. या पदाच्या निवडीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संघर्ष पाहायला मिळाला. अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानानं घेण्याची पद्धत बदलल्यानं विरोधकांनी सभात्याग केला.
राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाला सलग दुसऱ्यांदा नागपूरऐवजी मुंबईत सुरुवात झाली आहे. २२ ते २८ डिसेंबरदरम्यान हे अधिवेशन भरणार आहे. त्यातही २ दिवसांची सुट्टी असल्यानं केवळ ५ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात जनतेच्या हिताचे किती मुद्दे मार्गी लागतात, हा प्रश्नच आहे. शस्त्रक्रिया आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे या अल्पकालीन अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती काळ अपस्थित राहणार, याकडे सर्वांचंच लक्ष आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकत्र चहापान करण्याची प्रथा आहे. मात्र, या चहापानावर नेहमीप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार टाकला, तर सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशिवाय चहापान उरकला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक पाहायला मिळाले. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केलेल्या विधानाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता ऊर्वरीत दिवसांमध्येही दोन्ही गटांमध्ये मोठी खडाजंगी होणार असल्याची चिन्ह आहे.
विभानसभा अध्यक्षांच्या निवडप्रक्रियेवरुन आज अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानाने घेण्याची पद्धत का बदलली? एवढी सरकारला कसली भीती आहे? असा सवाल फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना केला. आवाजी मतदानानं विधानसभा अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
मराठा आरक्षण, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात विरोधक ठाकरे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. आरक्षणासाठीचा इम्पॅरिकल डेटा नेमका कुणी गोळा करायचा, याबाबत आधीच वाद आहे. त्यातच आगामी काळात राज्यात महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका नियोजित वेळेत होतील, की पुढे ढकलल्या जातील याबाबत अजुनही स्पष्टता नाही. राज्यात पेपरफुटीच्या घोटाळ्यामुळे आणि ऐन वेळी आरोग्य आणि म्हाडाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा सरकारवर रोष आहे. त्यांच्या या रोषाला वाचा फोडण्याचं काम विरोधक नक्की करतील.
एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन अधिवेशनाचं वातावरण तापलं जाण्याची शक्यता आहे. पगारवाढीच्या निर्णयानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी पूर्णत: संप मागे घेतलेला नाही. गेल्या दीड महिन्यापासून लालपरीच्या खंडित सेवेमुळे सर्वसामान्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. हा संप हाताळण्यात आलेल्या अपयशाचा मुद्दाही अधिवेशनात उठण्याची शक्यता आहे.
गेल्या २ वर्षांपासून जगावर कोरोनाचं संकट आहे. त्यात भारतानं आतापर्यंत २ कोरोना लाटांचा सामना केला. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूमुळे पुढील वर्षी फेब्रुवारीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारची काय तयारी आहे, याचा लेखाजोखाही अधिवेशनात मांडावा लागणार आहे. ख्रिसमस, नववर्षांच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर काही ठोस निर्बंध सरकार लावणार का याकडे सर्वसामान्यांचं लक्ष असेल.