Maharashtra Politics: मुंबईत ‘मैत्रीपूर्ण’ लढतीचा भडका! भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्षालाच डिवचले; ’50 खोके’च्या दिल्या घोषणा
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून, राजकीय चिखलफेक आता टोकाला गेली आहे. अशातच मुंबईतील वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील सत्तेत आणि महापालिकेत एकत्र लढणाऱ्या महायुतीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. येथील भाजप कार्यकर्त्यांनी चक्क आपल्याच मित्रपक्षाच्या (शिंदे गट) उमेदवाराविरोधात ’५० खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
‘दोस्तीत कुस्ती’ की राजकीय सूड?
मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये महायुतीचे जागावाटप झाले असले, तरी येथे ‘मैत्रीपूर्ण’ लढत पाहायला मिळत आहे. या वॉर्डमधून शिवसेनेच्या (शिंदे गट) पूजा कांबळे रिंगणात आहेत, तर भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांनीही शड्डू ठोकला आहे. शुक्रवारी सकाळी जेव्हा दोन्ही उमेदवारांचे समर्थक प्रचारासाठी आमनेसामने आले, तेव्हा परिस्थिती तणावपूर्ण बनली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी माईकवरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी चक्क उद्धव ठाकरे गटाचे ‘अस्त्र’ वापरत शिंदेंच्या शिवसेनेला ‘५० खोके एकदम ओके’ म्हणत हिणवले.
एबी फॉर्मच्या चोरीचा आरोप आणि वाद
या वादाची मुळे उमेदवारी अर्जाच्या गोंधळात दडलेली आहेत. भाजपने अधिकृतपणे ही जागा शिवसेनेला सोडली होती. मात्र, शिल्पा केळुस्कर यांनी भाजपचा ‘एबी’ फॉर्म जोडून अर्ज भरला. भाजप नेत्यांनी हा फॉर्म चोरीला गेल्याचा किंवा बनावट असल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने केळुस्कर यांचा अर्ज वैध ठरवल्याने येथे भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगला आहे. याच रागातून भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याच मित्रपक्षाच्या आमदारांना आणि नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून लक्ष्य केले.
शिंदे गटाचा संताप आणि ठाकरे गटाचा फायदा?
आपल्याच मित्रपक्षाने अशा प्रकारे अपमानजनक घोषणाबाजी केल्यामुळे शिवसेनेचे (शिंदे गट) कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. त्यांनीही भाजपविरोधात घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिले. या दोन मित्रपक्षांमधील भांडणाचा फायदा वॉर्डातील तिसरा मोठा खेळाडू म्हणजेच शिवसेना (ठाकरे गट) घेणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मतदानाला अवघे काही दिवस उरले असताना महायुतीमधील हा अंतर्गत कलह ‘मातोश्री’ आणि ‘वर्षा’ बंगल्यापर्यंत पोहोचला असून, याचे पडसाद संपूर्ण मुंबईत उमटण्याची शक्यता आहे.
