आता ‘नो’ वशीला, थेट लशीला; महाराष्ट्रात एक कोटी लसीकरणाचे लक्ष्य

WhatsApp Group

मुंबई – संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कंबर कसली आहे. पात्र नागरिकांचे शंभर टक्के लसीकरणाचे (vaccination) उद्दिष्ट सरकारने निर्धारित केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ‘मिशन कवचकुंडल’ ( Mission Kawach Kundal ) मोहिमेची घोषणा केली आहे. ८ ते १४ ऑक्टोबर पर्यंत ९० लाख नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यात लशींच्या उपलब्धतेमुळे लसीकरणाची मोहीम थंडावली होती. मात्र, पुरेश्या प्रमाणात लशींचा स्टॉक उपलब्ध असल्याने सरकारने लसीकरणाला गती दिली आहे.

लक्ष्य 1 कोटी:

महाराष्ट्रात सध्या ७५ लाख लशींचा साठ उपलब्ध आहे. आगामी काळात २५ लाख लशी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आगामी सहा दिवसात एक कोटी लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आरोग्य केंद्राव्यतिरिक्त वॉर्ड व प्रभागनिहाय लसीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

तिसऱ्या लाटेचा धोका?

संपूर्ण महाराष्ट्र सध्या अनलॉक करण्यात आला आहे. धार्मिक स्थळांसह शाळा देखील सुरू करण्यात आल्या आहेत. दसरा, दिवाळी या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोविड संसर्ग वाढीचा धोका टाळण्यासाठी सरकारने लसीकरणाला वेग दिला आहे.

नगर केंद्रबिंदू:

अहमदनगर जिल्ह्यात ६८ गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. सार्वजनिक वावरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नगर जिल्ह्यात सरासरी हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्ण वाढीचा आलेख कमी करण्यासाठी नगर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.