
₹ 1.76, ₹ 14.21 आणि ₹ 37.31… महाराष्ट्रातील पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विमा योजनेतून मिळालेली ही रक्कम आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील ढसाळा गावात 32 वर्षीय कृष्णा राऊत यांच्या 2 एकर पिकाचे नुकसान झाले. जेव्हा त्यांनी पीएम फसल विमा योजनेंतर्गत भरपाई मागितली तेव्हा त्यांना फक्त 1.76 रुपये मिळाले. 25 हजार रुपये खर्चून त्यांनी सोयाबीन, तूर, हरभरा पिकांची पेरणी केली होती. तसेच अन्य दोन शेतकऱ्यांना 14.21 रुपये आणि 37.31 रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. कृष्णा राऊत यांनी 455 रुपयांचा विमा हप्ता घेतला होता. यानंतर त्यांनी पीक नुकसान मूल्यांकनासाठी 200 रुपये वेगळे दिले होते. त्यांना एकरी 27 हजार रुपये नुकसान भरपाईची अपेक्षा होती.
कृष्णाप्रमाणेच आणखी एक शेतकरी गजानन चव्हाण यांना 14 रुपये 21 पैसे नुकसानभरपाई मिळाली. ते म्हणाले, ‘मी तीन एकर जमिनीवर चार पिके घेतली होती. यापैकी एकाच्या नुकसानीसाठी मला 14.21 रुपये, दुसऱ्या पिकासाठी 1200 रुपये आणि उर्वरित दोन पिकांसाठी काहीही मिळाले नाही. मी प्रीमियम म्हणून रु. 1,800 भरले होते.
गजाननचा यांचा भाऊ विक्रम म्हणाला की तो विमा कंपनीच्या हेल्पलाइनवर सतत कॉल करत राहिला पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पांडुरंग कदम या 33 वर्षीय विज्ञान पदव्युत्तर शेतकऱ्याला एका पिकासाठी 37.31 रुपये आणि दुसऱ्या पिकासाठी 327 रुपये नुकसानभरपाई मिळाली. त्यांच्याकडे दोन एकर जमीन आहे. त्यांनी योजनेसाठी रु. 595 भरले तर त्यांचा भाऊ इंद्रजितने रु. 1,980 चा प्रीमियम भरला ज्यासाठी त्यांना रु. 73.42 आणि रु. 260 ची भरपाई मिळाली.
परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल सूद यांनी सांगितले की, प्रशासन शेतकऱ्यांच्या दाव्यांचा आढावा घेत आहे. ते म्हणाले, ‘सुमारे 5 लाख शेतकऱ्यांना एकूण 160.9 कोटी रुपयांची विमा भरपाई देण्यात आली आहे. 88 हजार शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर झालेल्या नुकसानीसाठी 33 कोटींची भरपाई दिली जाणार आहे. ही परिस्थिती केवळ एका जिल्ह्यापुरती मर्यादित नसल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. आकडेवारीनुसार, परभणीतील 6.7 शेतकऱ्यांनी 4.4 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यासाठी खासगी विमा कंपन्यांना 48.2 कोटी रुपयांचा हप्ता भरला होता.