महाराष्ट्रातील भाजप महिला नेत्याची मध्य प्रदेशात हत्या, पतीला अटक

WhatsApp Group

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये महाराष्ट्रातील नागपुर येथील भाजप महिला नेत्या सना खान यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी सना खान हिच्या पतीसह तिघांना अटक केली आहे. नागपूर पोलीस या तिघांनाही आज न्यायालयात हजर करणार आहेत. नागपूर भाजप पदाधिकारी सना उर्फ ​​हीना खान 1 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली होती. तिच्या आईने मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

रिपोर्ट्सनुसार, सना खान 1 ऑगस्ट रोजी जबलपूरला आली होती, त्यानंतर तिचा शोध लागला नाही. या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत अमित साहू उर्फ ​​पप्पू याला अटक केली. आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे.

वृत्तानुसार, नागपूरच्या मानकपूर येथे राहणारी सना हिचे अमित साहूसोबत 6 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. दोघांचे हे दुसरे लग्न होते. सना एका मुलाची आई आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने सना खानची हत्या करून मृतदेह हिरण नदीत फेकून दिला.

आरोपीच्या सांगण्यावरून पोलीसही घटनास्थळी पोहोचले मात्र मृतदेह सापडला नाही. या हत्येत मुख्य आरोपीसह अन्य दोन जणांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांना नागपूर पोलिसांनी जबलपूरच्या घोडा बाजार परिसरातून अटक केली आहे.

नागपूरचे डीसीपी (झोन 2) राहुल मदने यांनी सांगितले की, मुख्य आरोपी अमित साहू (34 वर्ष) हा ढाबा चालवतो. भाजप पदाधिकारी सना खान यांच्याशी त्यांची ओळख होती. त्याने सनाचे अपहरण आणि नंतर हत्या केल्याची कबुली दिली आहे. अमित साहूने हा गुन्हा का केला हे सध्या स्पष्ट झालेले नाही.

नागपूर पोलिसांनी सांगितले की, अवस्थी नगर येथील रहिवासी सना खानची आई मेहरुनिशा यांनी तक्रार दाखल केली की, आपली मुलगी 1 ऑगस्ट रोजी अमित साहूला भेटण्यासाठी जबलपूरला गेली होती. तेव्हापासून त्यांच्या मुलीबद्दल काहीही माहिती नाही.

मेहरुनिशा यांनी सांगितले की, त्यांची मुलगी नागपूरहून जबलपूरला खासगी बसने गेली होती. तेथे पोहोचल्यानंतर सनाने त्याच्याशी बोलणेही केले होते पण नंतर ती बेपत्ता झाली. मेहरुनिशा यांच्या तक्रारीच्या आधारे मानकापूर पोलीस ठाण्यात अमित साहूविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.