
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा केलेला निर्धार आणि त्यानंतर राज्य सरकारच्या यंत्रणेलाच आव्हान दिल्याच्या आरोपाखाली राणा दाम्पत्यावर भारतीय दंड संहितेतील १२४-अ हे राजद्रोहाचे (Sedition) अत्यंत गंभीर कलम लावण्यात आले आहे.
राणा दाम्पत्य सध्या कोठडीमध्ये आहेत. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात असणार आहेत. कारागृहामध्ये घरचे जेवण मिळण्यासाठी राणा दाम्पत्याने अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने राणा दाम्पत्याची याचिका फेटाळली आहे.
मुंबईतील न्यायदंडाधिकारी कोर्टाने अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांचा तुरुंगामध्ये घरच्या जेवणासाठी केलेला अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्याला कोठडीमध्ये सर्वांना मिळणारे अन्नच ग्रहण करावे लागणार आहे. तर दुसरीकडे, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणी शनिवारी निर्णय घेण्यात येणार आहे.