
Ranji Trophy 2022 Final : रविवारी आज (26 जून) रणजी ट्रॉफी 2021-22 अंतिम सामन्याचा निकाल लागला. मध्य प्रदेश विरुद्ध मुंबई संघात बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मध्य प्रदेशने 6 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. या पराभवामुळे मुंबईचे 42 वे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले तर 87 वर्षांत पहिल्यांदाच मध्य प्रदेशच्या संघाने रणजी ट्रॉफी जिंकली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 374 धावा केल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या संघाने पहिल्या डावात सर्वबाद 536 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाला खास फलंदाजी करता न आल्याने ते 269 धावांवर सर्वबाद झाले. ज्यानंतर 108 धावांच लक्ष्य मध्य प्रदेश संघाने दुसऱ्या डावात 4 विकेट्स गमावत पूर्ण केलं आणि चषक आपल्या नावावर केला.
Madhya Pradesh Won by 6 Wicket(s) (Winners) #MPvMUM #RanjiTrophy #Final Scorecard:https://t.co/xwAZ13D0nP
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 26, 2022
सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने प्रथम फलंदाजी घेतली. मुंबईकडून पृथ्वी आणि यशस्वी यांनी चांगली सुरुवात केली. पण 47 धावा करुन कर्णधार पृथ्वी शॉ बाद झाला. यशस्वीकडून चांगला खेळ सुरुच होता, मात्र त्याला सोबत मिळत नव्हती. अखेर यशस्वीही 78 धावा करुन बाद झाला आणि तंबूत परतला. इतर खेळाडूंना खास कामगिरी करता येत आली अशात अनुभवी सरफराज खानने मात्र दमदार शतक ठोकत 134 धावा केल्या, ज्याच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 374 धावा केल्या.
पण त्यानंतर प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या संघाने दमदार फलंदाजी करत 536 धावा केल्या यादरम्यान एमपीच्या तीन फलंदाजांनी शतक ठोकले. यात यश दुबेने 133, शुभम शर्मा 116 आणि रजत पाटीदारने 122 धावा केल्या. सारांश जैननेही 57 धावा केल्यामुळे 536 धावांच्या मदतीने मध्य प्रदेशने 162 धावांची आघाडी घेतली.
दुसरा डाव खेळण्यासाठी आलेल्या मुंबईच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. केवळ सुवेद पारकरने 51 धावा करत अर्धशतक केलं. तर पृथ्वीने 44 आणि सरफराजने 45 धावा केल्या इतर सर्व स्वस्तात गेले. मध्य प्रदेशच्या कुमार कार्तिकेयने अप्रतिम गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतले आणि 269 धावांवर मुंबईचा डाव संपवला ज्यामुळे 108 धावांचे सोपे लक्ष्य मध्य प्रदेशला मिळालं.
108 धावांचे सहज गाठता येईल असे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या मध्य प्रदेश संघाने 4 विकेट्स गमावल्या पण रजत पाटीदारच्या नाबाद 30 धावांमुळे संघाने 29.5 षटकातचं विजय आपल्या नावावर केला. यावेळी शुभम शर्मानेही 30 तर हिमांशू मंत्रीने 37 धावा केल्या. ज्यामुळे मध्य प्रदेश संघाने विजय मिळवत इतिहास रचला.