IPL 2022: लखनौने मुंबईचा 36 धावांनी केला पराभव, मुंबईचा सलग आठवा पराभव

WhatsApp Group

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 37 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 168 धावा केल्या होत्या. लखनौने मुंबईला 169 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईला हे आव्हान पार करता आले नाही. मुंबईला 20 षटकांत 8 बाद 132 धावा करता आल्या आणि लखनौने 36 धावांनी सामना जिंकला.

नाणेफेक हरल्यानंतर लखनौची प्रथम फलंदाजी करताना चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर क्विंटन डी कॉक 10 धावा काढून बाद झाला. यानंतर केएल राहुल आणि मनीष पांडे यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी झाली. पांडे 22 चेंडूत 22 धावा काढून बाद झाला.

दुसरीकडे, मार्कस स्टॉइनिसने 0, कृणाल पांड्याने 1, दीपक हुडेडने 10 आणि आयुष बडोनीने 14 धावा केल्या. कर्णधार केएल राहुल 62 चेंडूत 103 धावा करून नाबाद राहिला. मुंबईकडून रिले मेरेडिथ आणि किरॉन पोलार्डने 2-2, डॅनियल सॅम्स आणि जसप्रीत बुमराहने 1-1 बळी घेतला.

लोकेश राहुलने या सामन्यात 61 व्या चेंडूवर षटकार खेचून शतक पूर्ण केले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध तीन शतक झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने 2019 मध्ये वानखेडेवर 64 चेंडूंत नाबाद 100, यंदा ब्रेबॉर्नपाठोपाठ ( 103*) वानखेडेवर शतक झळकावले. लोकेश 62 चेंडूंत 12 चौकार व 4 षटकारांसह 103 धावांवर नाबाद राहिला. लखनौने 6 बाद 168 धावांचा डोंगर उभा केला.

प्रत्युतरात मुंबईकडून फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला इशान किशनच्या रुपात पहिला मोठा झटका बसला त्याने  20 चेंडूत 8 धावा केल्या. त्यानंतर डेव्हाल्ड ब्रेव्हिस अवघ्या तीन धावांवर झेलबाद झाला. तर कर्णधार रोहित शर्मा 39 धावा करुन तंबुत परतला आहे. मुंबईकडून सर्वात चांगली फलंदाजी करणारा सूर्यकुमार यादव अवघ्या सात धावा करून तंबुत परतला. त्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना तिलक वर्मा 38 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर पोलार्ड 19 धावा करत झेलबाद झाला. मुंबईला 20 षटकांत 8 बाद 132 धावा करता आल्या आणि लखनौने 36 धावांनी सामना जिंकला. मुंबईचा या मोसमातील हा सलग आठवा पराभव आहे.