नवी दिल्ली – सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाचे आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) जोडणे अर्थात लिंक करणे (Link) अनिवार्य केले आहे. यासाठी सरकारकडून 31 मार्च 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसले तर तुमचे पॅन कार्ड 1 एप्रिल 2022 पासून निष्क्रिय (Deactivate) होईल. असे झाले तर त्या व्यक्तीला आर्थिक व्यवहार करत असताना अनेक अडचणी येऊ शकतात.
त्यामुळे ज्यांनी अद्याप हे काम केले नसेल त्यांनी तातडीने करून घ्यावे, असे आवाहन केंद्रीय कर मंडळाने (CBDT) म्हटले आहे. प्राप्तिकर विभागामार्फत (Income tax Department) देशातील प्रत्येक व्यक्तीला एक कायमस्वरूपी खाते क्रमांक अर्थात पॅन क्रमांक दिला जातो.
बँक खाते उघडणे, म्युच्युअल फंड किंवा शेअर्स खरेदी करणे तसेच 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेचे व्यवहार करणे यासारख्या अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन कार्ड अनिवार्य असते. आधार कार्डशी लिंक नसलेली सर्व पॅन कार्डे अंतिम मुदत संपल्यानंतर म्हणजे 1 एप्रिल 2022 पासून निष्क्रिय घोषित केली जातील, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.