पाहा व्हिडिओ: अबुधाबीत लिव्हिंगस्टोनचं वादळ, 6 चेंडूत ठोकल्या 32 धावा

WhatsApp Group

अबुधाबी – टी-10 लीगमध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या एका सामन्यात इंग्लंडचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने वादळी फलंदाजी करताना एकाच षटकात दोन चौकार आणि चार षटकार ठोकत 32 धावा चोपल्या. नॉर्दर्न वॉरियर्स आणि टीम अबुधाबी यांच्यात खेळलेल्या या सामन्यात अबुधाबीसाठी खेळणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोन डावातील 9 व्या षटकात ही वादळी खेळी साकारली.

9 व्या षटकात अबुधाबीच्या संघाने काढलेल्या ३५ धावांपैकी ३२ धावा लियामच्या बॅटमधून निघाल्या, तर ३ अतिरिक्त धावांची भेट गोलंदाज जोशुआ लिटलने ३ वाईड चेंडू टाकून दिली. लियामने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर दोन चौकार मारले. त्याचवेळी शेवटच्या 4 चेंडूत 4 षटकार ठोकले. लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असेलेल्या लियामच्या टी-10 लीगमधील या वादळी खेळीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


लियाम लिव्हिंगस्टोनची 23 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी

लियामच्या या शानदार फलंदाजीच्या जोरावर या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम अबुधाबीने निर्धारीत 10 षटकात 132 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने या सामन्यात 23 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 2 चौकार आणि 8 खणखणीत षटकारांचा समावेश होता. 133 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या नॉर्दन वॉरियर्सला केवळ 111 धावा करता आल्या आणि हा सामना त्यांना 21 धावांनी गमावावा लागला. लियाम लिव्हिंगस्टोनने केलेल्या या दमदार खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.


नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी T20 विश्वचषकातही लियामने आपल्या खेळीने सर्वांना प्रभावीत केले आहे. T20 विश्वचषकात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात लियामने T20 विश्वचषक 2021 मधील सर्वात लांब षटकार मारला होता. त्या सामन्यात त्याने हॅट्ट्रिक घेणाऱ्या कागिसो रबाडाच्या चेंडूवर हा षटकार मारला. हा षटकार 112 मीटर लांब होता. यानंतर त्याने रबाडाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरही षटकार लगावला होता. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंड न्यूझीलंडकडून पराभूत झाल्याने त्यांचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.