
पुणे – कोरोना काळात राज्य शासनाने नागरिकांच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिले असले तरीही विकासकामांना कोणतीही खीळ बसणार नाही याकडे आम्ही विशेष लक्ष दिले. सर्वच क्षेत्रात राज्याला पुढे ठेवले असून पुढेच राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या विविध योजना आणि गेल्या दोन वर्षातील ठळक कामगिरीचे सचित्र दर्शन घडवणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे उपस्थित होते. पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांनी उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री म्हणाले, आता कोरोनाच्या संकटातून आपण सावरलो असून विकासकामांवर अधिक जोमाने लक्ष देऊ. अर्थसंकल्पात तरतूद केलेली कामे आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण कशी होतील यासाठी वेळोवेळी आढावा घेऊन प्रयत्न करू असेही ते म्हणाले.