
सह्याद्री पट्ट्यातील मावळा हा नेहमीच शिवसेनेसोबत राहिला आहे. कोकणातील हा मावळा शिवसेनेमुळे वेगवेगळ्या पदावर पोचला. मात्र, काही लोकांनी गद्दारी केली. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा शिवसेनेच्या लोकांनी दाखवलेली आहे. आताही तीच परिस्थिती राहील. केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी आर्थिक प्रलोभन दाखवून शिवसेना संपवण्याचा विडा उचलला अशा या सत्तेसाठी लाचार झालेल्यांना धडा शिकवूया असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी कनेडी येथे बोलताना व्यक्त केला.
शिवसेनेच्या नाटळ सांगवे हरकुळ बुद्रुक विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आज खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा महिला प्रमुख नीलम पालव यांच्या उपस्थितीत झाले. विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सत्यनारायण पूजेचे ही आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून कनेडी परिसरामध्ये शिवसेनेच्या कार्यकत्यानी हजेरी लागली होती. परिसर भगवामय करून सोडला होता. ढोल ताशाच्या गजरात खासदार श्री. राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर लोकांना विश्वास आहे. त्यामुळेच या भागातील अनेक प्रश्न आम्ही गेल्या पाच वर्षात सोडवू शकलो. नरडवे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कुंभवडे धरणाचे कामही पुढच्या वर्षी पूर्ण होईल. त्यामुळे या भागात सिंचन क्षेत्र वाढवून हा भाग सुजलाम सुफलाम होईल. या भागामध्ये चुकीच्या पद्धतीने विकास कामे सुरू आहेत. कामे आम्ही करायचे आणि श्रेय त्यांनी लुटायचे अशी स्थिती आहे. नाटळ मल्हार पुलासाठी आम्ही तातडीने निधी मिळवून दिला. म्हणून यंदा हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाला. अशी अनेक विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून या भागांमध्ये झालेली आहे. मात्र, विकास कामे न करात केवळ सरकारी पैसा ठेकेदारीने लुटायचा. त्यांना आम्ही वेळोवेळ त्यांची जागा दाखवून दिली आहे. हा भाग १९९० पूर्वी ही शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आजही तो बालेकिल्ला अभेद आहे. हे आजच्या उपस्थितीवरून मला दिसून आले. असे सांगत खा. राऊत यांनी सर्वांचे कौतुक केले.