Lendl Simmons Retirement: वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज लेंडल सिमन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

WhatsApp Group

वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज लेंडल सिमन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने वेस्ट इंडिजसाठी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये 3763 धावा केल्या आहेत. 25 जून 1985 रोजी त्रिनिदाद येथे जन्मलेल्या लेंडल सिमन्सने 2006 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये पदार्पण केले. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 2015 मध्ये वेस्ट इंडिजकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. यानंतर खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे तो संघाचा भाग नव्हता. त्याने वेस्ट इंडिजसाठी 68 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31.58 च्या सरासरीने 1958 धावा केल्या. एकदिवसीय कारकिर्दीत त्याला केवळ दोनच शतके करता आली.

सिमन्सची कसोटी कारकीर्द फारशी चांगली नव्हती. त्याने 2009 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये पदार्पण केले आणि 2011 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. त्याच्या दोन वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने फक्त 8 सामने खेळले. यादरम्यान सिमन्सने 17.38 च्या सरासरीने 278 धावा केल्या.

लेंडल सिमन्सची टी-20 कारकीर्द इतर दोन्ही फॉरमॅटपेक्षा चांगली होती. सिमन्सने वेस्ट इंडिजकडून 68 टी-20 सामन्यात 1527 धावा केल्या. यादरम्यान त्याने 9 अर्धशतके झळकावली. कॅरिबियन प्रीमियर लीग फ्रँचायझी त्रिनबागो नाइट रायडर्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लेंडस सिमन्सच्या निवृत्तीची पुष्टी केली आहे.

लेंडल सिमन्सने आयपीएलमध्येही अनेक शानदार खेळी खेळल्या. त्याने आयपीएलच्या चार हंगामात भाग घेतला. त्याची सर्वोत्तम कामगिरी 2015 मध्ये झाली, जेव्हा त्याने या हंगामात 13 सामन्यांमध्ये 540 धावा केल्या होत्या. तेव्हा तो मुंबई इंडियन्सचा एक भाग होता. आयपीएलमध्ये त्याने 29 सामन्यांमध्ये 1079 धावा केल्या. 2014 मध्ये त्याने आयपीएलमध्येही शतक झळकावले होते.