
राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या आज, सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा महाविकास आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली आहे. या निवडणुकीमध्ये ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. सकाळी नऊ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, राज्यसभेत शिवसेनेला झटका बसल्यानंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने त्यातून धडा घेतला आहे. काँग्रेसने आधीपासूनच सतर्क राहून आपले सर्व आमदार वरळी इथल्या फोर सिझन हॉटेलमध्ये ठेवले होते. काँग्रेसचे हे सर्व ४४ आमदार या दोन्ही बसमधून विधानभवनामध्ये मतदानासाठी दाखल झाले आहेत.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील एक जागा रिक्त आहे तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता मावळली आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २५ ते २६ मतांची आवश्यकता असेल. गुप्त पद्धतीने मतदान होत असल्यामुळे मतांची फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जाते.