
महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांच्या लावणी नृत्याने एकेकाळी उत्तर महाराष्ट्र गाजवला होता. लालबाग परळचे हनुमान थिएटर त्यांच्या नृत्याने लोकप्रिय झाले. ज्याच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाळीस वर्षांपूर्वी अनेक तमाशाप्रेमींना वेड लावले होते, त्या आज रस्त्यावर भीक मागत आहे. बसस्थानकच तिचे घर बनले असून त्या अत्यंत दयनीय अवस्थेत जगत आहे.
शांताबाईंची कला, सौंदर्य आणि लोकप्रियता पाहून 40 वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकाचे कर्मचारी अत्तारभाई यांनी ‘शांताबाई कोपरगावकर’ नावाचा तमाशा केला. हा तमाशा प्रसिद्ध झाला. मात्र अशिक्षित शांताबाई यांची अत्तारभाईंनी फसवणूक केली.
यानंतर मानसिक आजाराने त्रस्त होऊन त्या भीक मागू लागल्या. नवरा नाही, जवळचे नातेवाईक नाहीत. आता कोपरगाव बसस्थानकच शांताबाईंचे घर झाले आहे. शांताबाई आज 75 वर्षांच्या आहेत. त्या तिथे बसून गाणी गात असतात. शांताबाईचे शीर्षक, अभिनय, हात हलवण्याची पद्धत आणि डोळ्यांची चमक पाहून कोणीतरी शांताबाईचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.
काही तमाशा कलाकारांनी हा व्हिडिओ पाहिला आणि कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पाठवला. खरात यांनी दोन दिवस शांताबाईचा शोध घेतला आणि अखेर त्या कोपरगाव बसस्थानकात सापडल्या. अरुण खरात व त्यांचे मित्र डॉ.अशोक गावितरे यांनी तिला दवाखान्यात नेले व शांताबाईंना वैद्यकीय मदत केली.