कोलकाता: शहरांमध्ये मित्र-मैत्रिणींचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे ही आता सामान्य बाब झाली आहे. मात्र, आजही भाड्याच्या घरात राहणाऱ्या तरुणांसाठी काही ‘नियम’ डोकेदुखी ठरू शकतात, याचा प्रत्यय कोलकात्यातील एका घटनेवरून आला आहे. केवळ एका महिला मैत्रिणीने घराचे वॉशरूम वापरले म्हणून घरमालकाने भाडेकरू तरुणाला चक्क पोलिसांत जाण्याची धमकी दिल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
अर्णब डी. साहा नावाच्या एका तरुणाने सोशल मीडियावर आपला हा कटू अनुभव शेअर केला आहे. अर्णबच्या घरी त्याची एक मैत्रीण आली होती. तिला वॉशरूमला जायचे असल्याने अर्णबने तिला आपल्या रूममधील वॉशरूम वापरण्यास सांगितले. ही अत्यंत साधी आणि मानवी गोष्ट होती. मात्र, तिथे असलेल्या केअरटेकरला हे मान्य नव्हते. त्याने तातडीने घरमालकाला फोन करून “अर्णबच्या रूममध्ये मुली येतात,” अशी तक्रार केली.
केवळ १० मिनिटांत ‘FIR’ ची धमकी
अर्णबचा फोन सायलेंटवर असल्याने त्याने सुरुवातीला घरमालकाचे कॉल्स उचलले नाहीत. यानंतर घरमालकाने थेट अर्णबच्या पालकांना फोन करून त्यांच्या मुलाबद्दल गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. १०-१५ मिनिटांतच हे प्रकरण इतके ताणले गेले की, घरमालकाने अर्णबला एफआयआर (FIR) दाखल करण्याची धमकी दिली. एका सामान्य प्रसंगाला घरमालकाने गुन्ह्याचे स्वरूप दिल्याने अर्णबला धक्का बसला आहे.
तरुणाचा वकिलाचा सल्ला घेण्याचा विचार
घरमालकाच्या या वागणुकीमुळे अर्णब प्रचंड मानसिक दडपणाखाली आला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एका साध्या गोष्टीवरून इतका मोठा वाद निर्माण करणे योग्य आहे का?” घरमालकाविरुद्ध कायदेशीर पाऊल उचलायचे का, यासाठी तो आता वकिलांचा सल्ला घेण्याचा विचार करत आहे.
