
T20I मालिकेत यजमानांचा 4-1 असा पराभव करून भारताने वेस्ट इंडिज दौरा संपवला. फ्लोरिडामध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्मासह अनेक नियमित खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आणि कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली. हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताने हा सामना 88 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यात विंडीजचे फलंदाज भारतीय फिरकीपटूंच्या चेंडूंवर नाचताना दिसले. हार्दिक पांड्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये अक्षर पटेलसह कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांना संधी दिली होती.
अक्षर पटेल Axar Patel आणि कुलदीप यादव Kuldeep Yadav यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या T20I मध्ये प्रत्येकी 3 बळी घेतले, तर रवी बिश्नोईने Ravi Bishnoi चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये नेले. यासह, T20I क्रिकेटमध्ये प्रथमच एका डावात 10 पैकी 10 विकेट फिरकीपटूंनी घेतल्या आहेत. यापूर्वी कोणत्याही संघाला ही कामगिरी करता आली नव्हती.
पाचव्या T20I सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गडी गमावून 188 धावा केल्या. टीम इंडियाच्या या धावसंख्येसमोर वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 15.4 षटकांत 100 धावांत गारद झाला. वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली.
दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माशिवाय सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि भुवनेश्वर कुमार या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. आता हे सर्व खेळाडू आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहेत. विंडीज दौऱ्यानंतर, टीम इंडिया झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाईल जिथे 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे, परंतु वरिष्ठ खेळाडू या संघाचा भाग नाहीत.