महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या शिफारशीसह क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान, धारणी, पुणे या संस्थेच्या वतीने “क्रांतीज्योत युवा कबड्डी सिरीज (पुरुष)” Kranti Jyot Youth Kabaddi Series आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील निमंत्रित १६ जिल्ह्याचे पुरुष संघ (२३ वर्षाखालील) या स्पर्धेत सहभागी होणार असून राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खर्डी, पुणे येथे ३० मार्च २०२३ ते १ मे २०२३ दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. प्रत्येक संघात १२ खेळाडू आणि ८ राखीव खेळाडूंचा सहभाग असणार आहे.
मुंबई शहर, अहमदनगर हौ. जिल्हा, मुंबई उपनगर, नांदेड, रत्नागिरी, धुळे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, पुणे, ठाणे, नंदुरबार, लातूर, परभणी, रायगड व पालघर ह्या १६ संघाच्या मध्ये रंगणाऱ्या ह्या स्पर्धेत ३३ दिवसात तब्बल १२५ सामने होणार आहेत.पहिल्या फेरीत १६ संघ दोन गटात विभागून त्यांच्यात २ गटात प्रत्येकी २८ – २८ साखळी सामने खेळवले जातील. तर दुसऱ्या फेरीत दोन्ही गटातील टॉप ४-४ संघ असे ८ संघ २८ साखळी सामने खेळतील. तिसऱ्या फेरीत दोन्ही गटातील बॉटमचे ४-४ असे ८ संघ २८ साखळी सामने खेळतील. चौथ्या आणि शेवटच्या प्लेऑफसच्या फेरीत दुसऱ्या फेरीतील सर्व ८ संघ आणि तिसऱ्या फेरीतील टॉप २ असे एकूण १० संघ १३ सामने खेळणार आहेत.
स्पर्धेत संघावर व खेळाडूंच्यावर भरघोस बक्षिसांचा वर्षाव होणार असून तब्बल ५५ लाख रुपयांच्या बक्षिसाचे वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाला तब्बल २० लाख रुपये, उपविजयी संघाला १० लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५ लाख रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी २ लाख रुपये, पाचव्या क्रमांकासाठी १ लाख रुपये तर सहाव्या क्रमांकासाठी ५० हजार रुपये अश्याप्रकारे बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्वात्कृष्ट चढाईपटूला ५० हजार रुपये, सर्वात्कृष्ट पकडपटूला ५० हजार रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच खेळाडूंना प्रत्येक सामन्यांत फेरीनुसार मॅच फी सुध्दा देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यात बेस्ट रेडर, बेस्ट डिफेंडर आणि कबड्डी का कमाल प्रत्येकी १५००/- रुपये अशी बक्षीस दिली जाणार आहेत.
युवा कबड्डी मालिकेत खेळल्यानंतर आता पर्यत जवळपास ३० खेळाडू प्रो कबड्डी लीगमध्ये त्यांच्या कामगिरीच्या आधारवर निवडले गेले आहेत. ही स्पर्धा प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफ्रॉम फॅनकोड वर दाखवली जाणार आहे. ही स्पर्धा पीकेल फ्रॅंचायझीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक तरुण प्रतिभा इथे पाहतात. तसेच तरुण खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी त्यांचे प्रशिक्षक स्पर्धेला भेट देतात त्यामुळे नक्कीच ही स्पर्धा महाराष्ट्रातील कबड्डीपटूंना फायदेशीर ठरेल यात शंका नाही.