
विहीर खोदत असताना क्रेनचा गियर बॉक्स तुटल्यामुळे झालेल्या मोठ्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी कोपरगाव तालुक्यामधील मुर्शतपूर शिवारात घडली. जेठालाल जग्गुला भील (वय 34) आणि त्यांची पत्नी शांती जेठालाल भील (वय 30, रा. मोखमपुरा, ता. आशिंद, जिल्हा भिलवाडा, राजस्थान) अशी मृतांची नावे आहेत.
मुर्शतपूर शिवारातील गणेश कारभारी रहाणे यांच्या शेतात रविवार (दि. 24) पासून 105 फूट उंचीची विहीर खोदण्याचे काम सुरू होते. त्यासाठी जेठालाल आणि त्यांची पत्नी शांती हे क्रेनच्या फरशीवर उभ्या असलेल्या विहिरीमध्ये उतरत होते. अचानक क्रेनचा गियर बॉक्स तुटला त्यामुळे दोघेही खाली पडले यात पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह विहिरीमधून बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून कोपरगाव पोलिसात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक भरत दाते अधिक तपास करत आहेत.