Kolkata Warehouse Roof Collapse: कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाची छत कोसळून भीषण दुर्घटना; 5 जणांचा मृत्यू, 20 जखमी
Kolkata Warehouse Roof Collapse: पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील तारातला परिसरात बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या गोदामाची छत अचानक कोसळल्याने पाच कामगारांचा मृत्यू झाला असून सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर प्रशासन, अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. माहितीप्रमाणे, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर छताचे काम सुरू असताना लोखंडी संरचना अचानक कोसळली आणि त्याखाली अनेक कामगार अडकले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
घटनेनंतर मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, एकूण 25 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी पाच जणांना मृतावस्थेत आणण्यात आले. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित 18 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मृत आणि जखमी झालेल्यांपैकी बहुतांश कामगार बिहारमधील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. काही लोक अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आले आहे.
दुर्घटनेनंतर लष्कर, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. लोखंडी संरचना कापण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात येत असून क्रेनच्या सहाय्याने मोठमोठे लोखंडी बीम आणि काँक्रीटचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, छत कोसळली तेव्हा अनेक कामगार इमारतीच्या आत काम करत होते. अचानक कोसळलेल्या लोखंडी बीम आणि सिमेंट-काँक्रीटच्या ढिगाऱ्याखाली हे कामगार दबले गेले. त्यामुळे बचावकार्य अधिक आव्हानात्मक बनले आहे. प्रशासनाने परिसरातील सुरक्षेची जबाबदारी वाढवून नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत कोलकाता महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रकारच्या बांधकामांवर 31 जुलैपर्यंत तात्पुरती बंदी जाहीर केली आहे. विशेषतः मागील सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या इमारती आणि व्यावसायिक प्रकल्पांचे सुरक्षा लेखापरीक्षण पूर्ण होईपर्यंत कामकाज थांबविण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, नागरी संरक्षण, कोलकाता पोलीस, महानगरपालिका आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती सर्व सुरू असलेल्या प्रकल्पांची तपासणी करणार आहे. सुरक्षा निकषांचे पालन करणाऱ्या प्रकल्पांनाच 1 ऑगस्टपासून पुन्हा काम सुरू करण्याची परवानगी दिली जाईल.
दरम्यान, या गोदामाला यंदाच्या जानेवारी महिन्यात बांधकामाची परवानगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. ही जमीन कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या मालकीची असून ती एका खासगी कंपनीला भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. प्राथमिक चौकशीत इमारतीच्या आराखड्यात किंवा संरचनात्मक डिझाइनमध्ये त्रुटी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यानंतर हावडा आणि बिधाननगर महानगरपालिका क्षेत्रांतील बांधकाम प्रकल्पांचीदेखील सुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे. राज्य सरकार लवकरच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मदत, नुकसानभरपाई आणि पुढील कायदेशीर कारवाईबाबत विधानसभेत सविस्तर माहिती सादर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
