कोलकाताकडून राजस्थानचा मोठा पराभव, मुंबईचं प्लेऑफ खेळण्याचं स्वप्न भंगणार!

WhatsApp Group

शारजाह – शिवम मावी आणि लॉकी फर्ग्युसनच्या वेगवान माऱ्याच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने गुरुवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा तब्बल 86 धावांनी पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकांत 4 गडी गमावत 171 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा संघ 16.1 षटकांत सर्वबाद 85 धावा करू शकला.

कोलकाताने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात वाईट झाली. पॉवरप्लेमध्ये राजस्थान रॉयल्सने चार विकेट्स गमावत फक्त 17 धावा केल्या. सरतेशेवटी, राहुल तेवातियाच्या 44 धावांच्या जोरावर 17 षटकांत 85 धावा करू शकला.

कोलकातासाठी शुबमन गिलने 44 चेंडूक 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या अर्धशतकी खेळीच्या जोरावर केकेआरने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 171 धावा उभारल्या. कोलकाताने उभारलेली 171 धावसंख्या आयपीएल 2021 मधील शारजाहमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी शिवम मावीने दमदार गोलंदाजी करत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर लॉकी फर्ग्यूसनने 3 विकेट्स घेतल्या. शाकिब अल हसन आणि वरुण चक्रवर्तीने यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केला. राजस्थानकडून गोलंदाजीत ख्रिस मॉरीस, चेतन साकारिया, राहुल तेवातिया आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी 1बळी पटकावला.

या विजयासह आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्सने 14 गुणांसह आपले चौथे स्थान अधिक मजबूत केले आहे. या मोठ्या विजयामुळे मुंबईच्या संघावर मात्र आयपीएलमधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवणार आहे.

संक्षिप्त धावफलक

कोलकाता नाईट रायडर्स – 171/4 ( शुभमन गिल 56, व्यंकटेश अय्यर 38 : राहुल तेवाटिया 1-11)

राजस्थान रॉयल्स – 85/10 ( राहुल तेवातिया 44 : शिवम मावी 4-21, लॉकी फर्ग्युसन 3-18)