मुंबईचा सलग तिसरा पराभव, कोलकाताने उडवला मुंबईचा ५ विकेट्सने धुव्वा

WhatsApp Group

कोलकाता नाईट रायडर्सने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पराभवाची हॅटट्रिक केली आहे. पाकिस्तान दौऱ्यानंतर पुन्हा मैदानावर उतरलेल्या पॅट कमिन्सने पहिल्याच आयपीएल सामन्यामध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि १४ चेंडूंत अर्धशतक करत विक्रमाला गवसणी घातली. त्याच्या फटकेबाजीमुळे कोलकाताने हा सामना १६व्या षटकातच जिंकला.

कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली कामगिरी करून मुंबई इंडियन्सला ५५ धावांवर ३ धक्के दिले होते. पण, अजिंक्य रहाणेने कॅच सोडून जीवदान दिल्यानंतर तिलक वर्माने चौथ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसोबत ४९ चेंडूंत ८३ धावा केल्या.

उमेश यादवने तिसऱ्या षटकात रोहित शर्माची विकेट घेतली. तर पदार्पणवीर डेवॉल्ड ब्रेव्हिसने १९ चेंडूंत २९ धावांची खेळी केली. इशान किशनला पॅट कमिन्सने १४ धावांवर बाद केले. १३व्या षटकात तिलक वर्माला जीवदान मिळाले. सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर बाद झाला. तिलक वर्मा २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर किरॉन पोलार्डने तीन षटकार खेचून मुंबई इंडियन्सला ४ बाद १६१ धावांपर्यंत मजल मारून दिली. पोलार्ड ५ चेंडूंत ३ षटकारांसह २२ धावांवर नाबाद राहिला.

प्रत्युत्तरात अजिंक्य रहाणे व वेंकटेश अय्यरने सावध सुरुवात केली. ५व्या षटकात टायमल मिल्सने टाकलेला चेंडूवर अजिंक्य रहाणे ७ धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने चौकाराने सुरुवात केली, परंतु मुंबई इंडियन्सने रणनीती आखून त्याची विकेट घेतली. अय्यरचा १० धावांवर बाद झाला. कोलकाताने ६ षटकांत ३५ धावांत २ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर मुरुगन अश्विनने दोन धक्के दिले. सॅम बिलिंग धावा करत बाद झाला तर नितीश राणा ८ धावांवर बाद झाला. कोलकाताची अवस्था ४ बाद ८३ अशी झाली होती. त्यानंतर आंद्रे रसेलने खणखणीत षटकार खेचला, परंतु टायमल मिल्सने त्याची विकेट घेतली. रसेल ५ चेंडूंत ११ धावांवर बाद झाला.

पॅट कमिन्सची ऐतिहासिक खेळी – या सामन्यात पॅट कमिन्सने चौफेर फटकेबाजी करत अवघ्या १५ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच कमिन्सने आयपीएल इतिहासामध्ये १४ चेंडूंत अर्धशतक झळकावून सर्वात जलद अर्धशतकाच्या लोकेश राहुलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे Pat Cummins Slams Joint-Fastest Fifty In IPL . कमिन्ससह वेंकटेश अय्यरनेही ४१ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारांसह ५० धावा केल्या. या दोघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाताने ५ विकेट्सने हा सामना जिंकला.

असा होता कोलकाता नाईट रायडर्सचा संघ – अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रशीख सलाम, वरुण चक्रवर्ती

असा होता मुंबई इंडियन्सचा संघ –  इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेव्हज, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी