कोल्हापूरकरांनी घडवला इतिहास! काँग्रेसच्या जयश्री जाधवांच्या रुपाने कोल्हापूरला मिळाला पहिला महिला आमदार
कोल्हापूर – कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असून यात काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९६२२६ इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ७७४२६ इतकी मत मिळाली आहे.
महाविकास आघाडी विरोधात भाजप अशा अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसला गड राखण्यात मोठं यश मिळालं आहे. आक्रमक प्रचार आणि नेत्यांची फौज मैदानामध्ये उतरवूनही विजय न मिळाल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते.
कोल्हापूरकरांनी इतिहास घडवला!
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात इतिहास घडला, कोल्हापूरला जयश्रीताईंच्या रूपाने पहिल्या महिला आमदार मिळाल्या.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीने पुन्हा एकदा समतेचा संदेश दिला.
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) April 16, 2022
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या आशीर्वादानंतर कोल्हापुरमध्येही अंबाबाईचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला होता. पण या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागणार आहे.