IPL 2022: आयपीएल जिंकणाऱ्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, जाणून घ्या किती आहे बक्षिसाची रक्कम

WhatsApp Group

२६ मार्च २०२२ रोजी इंडियन प्रीमियर लीग या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या १५व्या हंगामाला सुरुवात झाली होती. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सुरू असलेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी (२९ मे) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर या स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे. आपला पहिलाच आयपीएल हंगाम खेळणारा गुजरात टायटन्सचा संघ क्वॉलिफाय १ सामना जिंकून सर्वात अगोदर अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे. तर, शुक्रवारी (२७) झालेल्या क्वॉलिफायर २ सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून राजस्थान रॉयल्सही अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामाचे विजेतपद आणि बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध लढताना दिसतील.

गतवर्षी जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला २० कोटी रुपये देण्यात आले होते. यावर्षीदेखील विजेत्यांना इतकीच रक्कम दिली जाणार आहे. बक्षीस रकमेत कोणताही बदल होणार नाही. मात्र, उपविजेत्या संघाला गतवर्षीच्या तुलनेत ५० लाख रुपये अधिक मिळणार आहेत. म्हणजेच यावर्षी उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये दिले जातील. तर, तीसऱ्या क्रमांकाच्या संघाला (आरसीबी) ७ कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाला (एलएसजी) ६.५ कोटी रुपये दिले जातील. यासोबतच इतर वैयक्तिक पुरस्कारांच्या रकमेत देखील वाढ करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूला २० लाख रुपये दिले जाणार आहेत तर ऑरेंज कॅप व पर्पल कॅपचे मानकरी असलेल्या खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपये दिले जाणार आहेत.

२००८ मध्ये पहिल्यांदा आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ पहिला विजेता ठरला होता. शेन वॉर्नच्या संघाला त्यावेळी ४.८ कोटी रुपये मिळाले होते. आताची बक्षिसाची रक्कम जवळपास चौपट झाली आहे. कोट्वधी रुपयांच्या बक्षिस रकमेमुळेच आयपीएल ही जगातील सर्वात मोठी ‘लीग क्रिकेट’ स्पर्धा मानली जाते.