बाळासाहेबांनी ‘मशाल’ या चिन्हावर लढवली होती निवडणूक, जाणून घ्या शिवसेनेच्या बाण आणि धनुष्याच्या चिन्हाची संपूर्ण कहाणी

Shiv Sena Election Symbols: बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला पक्षाच्या स्थापनेनंतर तब्बल 23 वर्षांनंतर ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळाले होते. यापूर्वीही या पक्षाने विविध चिन्हे वापरून निवडणूक लढवली होती. 1968 मध्ये ‘तलवार आणि ढाल’ उमेदवारांनी वापरले होते आणि 1985 मध्ये उमेदवारांनी ‘मशाल’चा वापर केला होता. आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या चिन्ह आणि नावावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला – ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ‘ मशाल’ आणि शिंदे गटाला ‘दोन तलवारी आणि एक ढाल’ चिन्ह दिलं आहे.
त्यावेळचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मुंबईतील माझगाव मतदारसंघातून ‘मशाल’ या चिन्हावर निवडणूक जिंकले होते, तेव्हा संघटनेकडे निश्चित चिन्ह नव्हते. मात्र, नंतर भुजबळांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रमुख नेते आहेत.
शिवसेनेने या चिन्हांवर निवडणूक लढवली आहे
शिवसेनेने यापूर्वी नागरी आणि विधानसभा निवडणुकीत ‘मशाल’ चिन्हाचा वापर केला होता. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, पक्षाच्या बहुतांश उमेदवारांना 1968 मध्ये ‘तलवार आणि ढाल’ हे चिन्ह मिळाले होते, जेव्हा त्यांनी मुंबईसह पहिल्या स्थानिक निवडणुका लढवल्या होत्या. यानंतर 1985 मध्ये अनेक उमेदवारांना ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले. कीर्तीकर हे पक्षाच्या स्थापनेपासूनच आहेत.
‘धनुष्यबाण’ मिळायला 23 वर्षे लागली
शिवसेना 1966 मध्ये स्थापन झाली आणि पक्षाला समर्पित ‘धनुष्य-बाण’ चिन्ह मिळविण्यासाठी 23 वर्षे लागली. शिवसेनेला 1989 मध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली होती, याचा अर्थ तो राज्यात एकसमान चिन्ह वापरू शकतो. मात्र त्यापूर्वी 1966 ते 1989 या काळात लोकसभा, विधानसभा आणि नागरी निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली.
दोन्ही गटांसाठी नवीन नावे
तब्बल 33 वर्षांनंतर निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात ‘धनुष्यबाण’ चिन्हावर अंतरिम कालावधीसाठी शिक्कामोर्तब केले. शिवसेनेतील दोन गटातील वाद पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच दोन्ही पक्षांना ‘शिवसेना’ हे नाव न वापरण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटासाठी पक्षाचे नाव ‘शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि पक्षाच्या एकनाथ शिंदे गटासाठी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले आहे.