WI vs IND: वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूला कोरोनाची लागण

WhatsApp Group

WI vs IND: वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार खेळाडू लोकेश राहुलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राहुल भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 मालिकेचा भाग आहे आणि फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर तो कॅरेबियन देशाला रवाना होणार होता. मात्र त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत.

वेस्ट इंडिज क्रिकेट संघ आणि भारतीय क्रिकेट संघ यांच्यात 22 जुलैपासून एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. ज्यामध्ये टीम इंडियाच्या विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसारख्या अनेक बड्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर विराट वगळता इतर सर्व खेळाडू 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेतून संघात सामील होतील. केएल राहुलचाही टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र त्याची निवड त्याच्या फिटनेसवर आधारित असेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत केएल राहुलची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती, परंतु मालिका सुरू होण्यापूर्वी त्याच्या दुखापतीची बातमी आली आणि तो मालिकेतून बाहेर पडला. या दुखापतीमुळे तो इंग्लंड दौऱ्यावरही संघासोबत गेला नाही. निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला विश्रांती दिली. त्याचा टी-20 मालिकेत समावेश करण्यात आला. मात्र, टी-20 मालिका सुरू होण्यासाठी अजून एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधी बाकी आहे. भारतीय संघाला 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे, जी 29 जुलैपासून सुरू होणार आहे. याआधी, टीम इंडिया शिखर धवनच्या नेतृत्वाखाली 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, जी शुक्रवारपासून पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनाद येथे सुरू होणार आहे.

IND vs WI टी-20 मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला सामना – 29 जुलै
  • दुसरा सामना – 01 ऑगस्ट
  • तिसरा सामना – 02 ऑगस्ट
  • चौथा सामना- 06 ऑगस्ट
  • पाचवा सामना – 07 ऑगस्ट