राज्याच्या राजकारणात खळबळ, मंत्रालयात अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाइल तपासताना सोमय्यांचा फोटो व्हायरल
मुंबई – भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या एका फोटोमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते राज्याच्या नगरविकास विभागाच्या कार्यालयात एका सरकारी अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फायली तपासताना दिसत आहेत.
किरीट सोमय्या यांचा थेट मंत्रालयात प्रवेशावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. किरीट सोमय्या येथे कोणत्या अधिकाराने गेले होते, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांना नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फायली तपासण्याची परवानगी दिली होती का, याचा शोध घ्यावा, असेही काँग्रेस प्रवक्ते म्हणाले.
किरीट सोमय्यांना या घटनेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आरटीआय अंतर्गत काही माहिती मागवली होती, त्या संदर्भात ते कार्यालयात पोहोचले होते.