
दिल्लीतील काश्मिरी पंडितांबाबत दिल्ली सरकारने मोठी घोषणा केली आहे. तेथील INA मार्केट मधील दुकानांमध्ये मोफत वीज जोडणी करून देणार असल्याचे सांगितले. या संदर्भात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी बीएसईएस आणि पीडब्ल्यूडीसह संबंधित विभागांच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मार्केटमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी निवडलेल्या जागेची तात्काळ पाहणी करण्याचे निर्देश सिसोदिया यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यासोबतच एका महिन्याच्या आत सर्व काश्मिरी पंडितांच्या दुकानात मोफत वीज जोडणी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्ली जल मंडळाचे उपाध्यक्ष आणि ग्रेटर कैलाशचे आमदार सौरभ भारद्वाज हेही या बैठकीला उपस्थित होते.
अलीकडेच काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन वीज कनेक्शनची समस्या सांगितल्याची माहिती आहे. काश्मिरी पंडितांनी सांगितले की, त्यांची INA मार्केटमध्ये 100 हून अधिक दुकाने आहेत, जी विविध बांधकाम कामांमुळे वर्षानुवर्षे स्थलांतरित करावी लागली.
सध्या या दुकानांमध्ये विजेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना नसल्यामुळे दुकानदारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश विभागाला दिले.
मंगळवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकार नेहमीच काश्मिरी पंडितांच्या मदतीसाठी नेहमीच उभी राहिली आहे. काश्मिरी पंडितांवर राजकारण करण्याऐवजी त्यांच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी आम्ही नेहमीच काम केले आहे. ते म्हणाले की, काश्मिरी पंडितांच्या या समस्येची तातडीने दखल घेण्यात आली आहे.