कराड – येथील बापूजी साळुंखे पुतळ्याच्या परिसरामध्ये असलेल्या वस्तीला शनिवारी सकाळच्या दरम्यान भीषण आग लागली. रौद्ररूप धारण केलेल्या आगीमध्ये चार सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे हा संपुर्ण परिसर हादरून गेला आहे gas cylinder blast in in karad. वस्तीमधील एका महिला सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र भयावह आगीमध्ये २४ घरे जळून खाक झाली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कराड मधील न्यायालयाच्या समोरील बाजूस बापूजी साळुंखे यांचा पुतळा परिसर आहे. या परिसरामध्ये पाठीमागच्या बाजूला असलेल्या वस्तीमध्ये मध्यरात्री अचानक आग लागली. एका घराला लागलेली आग नंतर वेगाने वाढत गेली. आग लागल्यामुळे महिलांसह सर्व नागरिक आरडाओरडा करत रस्त्यावर आले. त्या महिलांसह आसपासच्या नागरिकांनी आग लागलेल्या घरांशेजारील असणाऱ्या इतर घरात झोपलेल्या कुटूंबांना जागे करत बाहेर आणले. तोपर्यंत आग प्रचंड वाढत जात होती.
आगीच्या भडक्यामध्ये चार घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे हा परिसर हादरून गेला. सिलेंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज झाल्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांसोबत पोलिसांनीही प्रयत्न केले.