Sindhudurg: कणकवलीतील नांदगावात धक्कादायक प्रकार! तृतीयपंथीयाने जादूटोण्याने युवतीला फसवण्याचा केला प्रयत्न

कणकवली: नांदगाव येथे गुरुवारी (दि. २७) दुपारी १२.४५ च्या सुमारास एका युवतीला तृतीयपंथीयाकडून पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र, सतर्क नागरिकांनी तत्परता दाखवत पाठलाग करून हुमरठ येथे तृतीयपंथीयाला पकडले आणि पोलिसांच्या मदतीने युवतीची सुटका करण्यात यश मिळवले. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तृतीयपंथीय व्यक्ती नांदगाव येथे फिरत असताना एका युवतीशी संवाद साधू लागली. बोलण्यात गुंतवत तिने युवतीला मोहिनीच्या जाळ्यात ओढले आणि विश्वास संपादन करून तिला सोबत घेण्यास प्रवृत्त केले. काही वेळातच संबंधित तृतीयपंथीयाने युवतीला एका वाहनात बसवले आणि कणकवलीच्या दिशेने रवाना झाली.
नागरिकांची सतर्कता
युवती बराच वेळ दिसली नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी शोध सुरू केला. काही लोकांनी तिला तृतीयपंथीयासोबत जाताना पाहिल्याची माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी एकत्र येऊन वाहनाचा पाठलाग सुरू केला. हुमरठ गावाजवळ नागरिकांनी वाहन थांबवले आणि तृतीयपंथीयाला पकडून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
साथीदाराला नांदगावमध्येच पकडले
दरम्यान, या प्रकारात तृतीयपंथीयाच्या एका साथीदाराचा सहभाग असल्याचे समोर आले. ग्रामस्थांनी त्याला नांदगावमध्येच अडवून ठेवले आणि पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
जादूटोण्याचा संशय?
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी युवतीवर जादूटोणा करण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलून दाखवले. मात्र, अद्याप अधिकृतरीत्या याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध झालेला नाही. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, गावकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे. स्थानिक प्रशासनाने याप्रकरणी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.