बापूंना शिविगाळ आणि गोडसेचे गोडवे गाणाऱ्या कालीचरण महाराजांचं महाराष्ट्र कनेक्शन…
महात्मा गांधींचा देश अशी जगात भारताची ओळख आहे. याच देशात एका तथाकथित संताकडून गांधींना शिव्या घातल्या जातात, त्यांच्या मारेकऱ्यांचे आभार मानले जातात, हे अतिशय दूर्देवी आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच आवर न घातल्यास देशातील धार्मिक सलोख्याला धोका आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानं कालीचरण बाबा सध्या चर्चेत आहे. महात्मा गांधींनी देशाचा सत्यानाश केल्याची आगपाखड करतानाच नथुराम गोडसेचे त्यांनी गोडवे गायले. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये आयोजित धर्मसंसदेत केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्यावर छत्तीसगडसह अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संत, महात्मे हे खरं तर अहिंसा, त्याग, एकता, सर्वधर्मसमभावाची शिकवण देत असतात. मात्र, कालीचरण सारखे काही महाराज संतांच्या प्रतिमेला तडा देण्याचं काम करतात. धर्माचं संरक्षण करण्याच्या नावाखाली परधर्मियांची निंदा करतात. स्वधर्मियांना हिंसा करण्यासाठी उकसवतात. रायपूरमध्ये महात्मा गांधींना शिव्या आणि गोडसेवर स्तुतीसुमनं उधळली जात असताना टाळ्या पिटणाऱ्यांची कमी नव्हतीच. या सर्व धर्मांध प्रवृत्ती आपल्या धर्मनिरपेक्ष देशाला खिळखिळं करण्याचं काम करत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींच्या अमुल्य योगदानाचा अशा प्रवृत्तींना एवढ्यातच विसर पडला ही मोठी शोकांतिका आहे.
आगामी काळात उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाबसह ५ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी हिंदू आणि हिंदूत्व हे मुद्दे सर्वच राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आहेत. त्याला काँग्रेसही अपवाद नाही. एरवी धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या काँग्रेसलाही हिंदुत्वाच्या मुद्दाला साद घालावी लागली, यातच सर्व आलं. त्यामुळे हिंदुत्वाच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करण्याऱ्या अशा भोंदुबाबांचे सध्या अच्छे दिन सुरु आहेत. निवडणुकांच्या तोंडावर धर्मसंसदेत काहीही बरळायचं, लोकभावना भडकावून एखाद्या विशिष्ट पक्षासाठी मतांचा पाऊस पाडायचा, हा एकुणच अजेंडा अशा बाबांकडून राबवला जात आहे.
‘विष्णूमय जग, वैष्णवांचा धर्म; भेदाभेद भ्रम, अमंगळ’ अशी शिकवण देणाऱ्या महाराष्ट्राच्या संतभूमीत जन्मलेल्या कालीचरण महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन होऊच शकत नाही. ‘फासीवर चढवा तरी काही फरक पडणार नाही, गांधींना शिव्या घातल्याचा पश्चाताप नाही’ असं छातीठोकपणे कालिचरण म्हणत आहेत. या त्यांच्या फाजिल आत्मविश्वासाला कुणाचं बळ आहे? सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्यांवर एरवी उठसूठ देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. आता या प्रकरणात मोठी कारवाई होणार का? की हिंदुत्वाच्या तथाकथित जपवणूकीसाठी अशा बाबांना पाठीशी घातलं जाणार, हा प्रश्न आहे.
कालीचरण महाराजांचं महाराष्ट्र कनेक्शन…
२०२० मध्ये मध्यप्रदेशातील भोजपूरमधल्या शिवमंदिरात गायलेल्या शिवतांडव स्त्रोत्रामुळे कालीचरण महाराज प्रसिद्धीझोतात आले होते. उंच, पिळदार शरीरयष्टी लाभलेले कालीचरण महाराज अल्पावधीतच लोकप्रिय झाले. कालीचरण महाराज हे मुळचे महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील आहेत. शिवाजीनगरच्या भावसार पंचबंगला भागात त्यांचे कुटुंबीय राहतात. अभिजीत धनंजय सराग हे कालिचरण महाराजाचं मुळ नाव आहे. २०१७ मध्ये त्यांनी अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये अकोल पश्चिम मतदारसंघातून आमदारकी लढवणार असल्याच्याही त्यावेळी चर्चा होत्या.